यवतमाळ नगरपालिका बरखास्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 09:56 PM2019-06-20T21:56:38+5:302019-06-20T21:57:32+5:30
नगरपरिषदेतील सर्वसाधारण कामकाजावर लोकप्रतिनिधींचा नियमबाह्य व बेकायदेशीर हस्तक्षेप आहे. यामुळे पालिकेच्या नावलौकिकाला बाधा पोहोचत आहे. नागरिक मुलभूत सुविधा व अधिकारांपासून वंचित राहात असल्याने यवतमाळ नगरपालिका तत्काळ बरखास्त करावी, अशी मागणी आम्ही यवतमाळकर टीमच्यावतीने करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नगरपरिषदेतील सर्वसाधारण कामकाजावर लोकप्रतिनिधींचा नियमबाह्य व बेकायदेशीर हस्तक्षेप आहे. यामुळे पालिकेच्या नावलौकिकाला बाधा पोहोचत आहे. नागरिक मुलभूत सुविधा व अधिकारांपासून वंचित राहात असल्याने यवतमाळ नगरपालिका तत्काळ बरखास्त करावी, अशी मागणी आम्ही यवतमाळकर टीमच्यावतीने करण्यात आली आहे.
शहरातील सफाईचे कंत्राट नियमबाह्य पद्धतीने दिले असून वित्तीय मान्यता न घेता कंत्राटदारास काम बहाल केले. पालिका फंडाचा पैसा यावर खर्च झाल्याने शहरातील मुलभूत सुविधेची कामे खोळंबली आहेत. कंत्राटदाराने काम बंद केल्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सफाईचे कंत्राट लोकप्रतिनिधींनी बेकायदेशीरपणे हस्तक्षेप करत ६५:३५ या टक्केवारीत विभागून दिले आहे. शहरातील कचऱ्याचे वर्गीकरण केले जात नाही. ओला व सुका कचरा एकत्र जमा करून धामणगाव रोड ते नागपूर बायपास परिसरातील शासकीय खुल्या जागेत डम्प केला जात आहे. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून व घनकचरा व्यवस्थापन कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. शहरात साथीचे आजार उद्भवण्याची भीती आहे. दलित वस्ती निधी अंतर्गत गैरदलित वस्तीमध्ये कामे केली जात आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे ३०८ अंतर्गत प्रकरण दाखल करण्यात आले आहे. तरीसुद्धा नव्याने वर्क आॅर्डर देऊन काम केले जात आहे. पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी कायद्याला जुमानत नसल्याचे दिसून येते. यामुळे शहराच्या हितासाठी नगरपरिषद सत्ता बरखास्त करावी व येथील कारभाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी आम्ही यवतमाळकर टीमचे जिल्हा बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. मिनाज मलनस, अॅड. जयसिंह चव्हाण, अमित मिश्रा, सैयद सोहराब, अॅड. बिपीन ठाकरे, अॅड. आकाश मंगतानी, अॅड. निरंजन दाढे, अॅड. मुकेश श्रीवास, अॅड. इम्रान देशमुख उपस्थित होते.