जनतेच्या तक्रारी बेदखल

By admin | Published: November 18, 2015 02:39 AM2015-11-18T02:39:09+5:302015-11-18T02:39:09+5:30

वणी उपविभागातील जनतेला आता पालकमंत्र्यांच्या जनता दरबाराची प्रतीक्षा लागली आहे.

Displacement of public grievances | जनतेच्या तक्रारी बेदखल

जनतेच्या तक्रारी बेदखल

Next

जनता दरबाराची प्रतीक्षा : पाच महिन्यांचा पडला खंड
वणी : वणी उपविभागातील जनतेला आता पालकमंत्र्यांच्या जनता दरबाराची प्रतीक्षा लागली आहे. पहिला जनता दरबार झाल्यानंतर पाच महिन्याचा खंड पडल्याने पुन्हा नागरिकांकडे अनेक तक्रारी निर्माण झाल्या आहेत. या तक्रारींना संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहे. पालकमंत्री पुन्हा कधी जनता दरबार घेणार व आम्ही कधी आपली गाऱ्हाणी मांडतो असे जनतेला वाटू लागले आहे.
वणी उपविभागातील अनेक विभागामध्ये जनतेच्या कामांकडे दुर्लक्ष केले जाते. सामान्य नागरिक नियमात बसणारे काम करण्यासाठीही कोणत्याही कार्यालयात गेले असता त्यांना कार्यालयातील बाबुगीरीकडून तक्रारकर्त्यांनाच हुसकावून लावले जाते. मात्र वशिल्याने तात्काळ प्रतिसाद मिळतो. असा अनुभव अनेकांना आला आहे.
जनतेची बाबुगीरीच्या जाचातून मुक्तता व्हावी म्हणून पालकमंत्री ना.संजय राठोड यांनी जुलै महिन्यात वणी उपविभागीय स्तरावर जनता दरबार घेतला होता. त्यावेळी वणी, मारेगाव व झरी तालुक्यातून अक्षरश: तक्रारींचा पाऊस पडला होता. सतत आठ तास बसूनही संपूर्ण तक्रारीचा निपटारा पालकमंत्र्यांना करता आला नव्हता. मात्र अनेक तक्रारीवर संबंधित अधिकाऱ्याने सकारात्मक उत्तरे दिल्याने तक्रारकर्त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. दुसरा जनता दरबार आॅगस्ट महिन्यात घेण्यात येईल.
त्यावेळेपर्यंत पहिल्या जनता दरबारातील सर्व तक्रारींचा निपटारा व्हायला पाहिजे, अशी तंबी त्यावेळी पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिली होती.
नागरिकांच्या तक्रारीवर काय निर्णय घेण्यात आला. याचे लेखी उत्तर तक्रारकर्त्याला कळविण्याच्या सूचनाही त्यावेळी देण्यात आल्या होत्या. मात्र अनेक तक्रारकर्त्यांना अजूनही त्यांच्या तक्रारीचे काय झाले, याची माहिती प्राप्त झाली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यावेळी आपली वेळ मारून नेली तर नाही ना, असे अनेकांना वाटू लागले आहे.
दुसऱ्या दरबारात या अधिकाऱ्यांची पोलखोल होणार, असे जनतेला वाटत होते. मात्र पाच महिने लोटूनही दुसरा जनता दरबार घेण्यात आलाच नाही. त्यामुळे जनतेची घोर निराशा झाली असून आता जनतेला दुसऱ्या जनता दरबाराची प्रतीक्षा आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Displacement of public grievances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.