शेतीच्या वाटणीवरून वाद; मुलानेच पित्यावर घातले चाकूने ३० घाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 06:03 PM2022-02-16T18:03:22+5:302022-02-16T18:07:28+5:30
मनात राग असलेला त्यांचा लहान मुलगा हरिदासने झोपेतच पित्यावर चाकूने वार केले. एकदा नव्हे, तर तब्बल ३० वेळा स्वत:च्या वडिलांचे शरीर भोसकून काढले.
यवतमाळ : जन्मदात्या पित्यासोबत शेतीच्या वाटणीवरून वाद झाला. याचा राग मनात धरून सर्वात लहान मुलाने चौकीदारी करीत असलेल्या पित्यावर मंगळवारी रात्री चाकूने ३० घाव घातले. यात पित्याचा जागीच मृत्यू झाला. ही मन हेलावणारी घटना कळंब तालुक्यातील खैरी येथे घडली.
भीमराव सोनबा घोडाम (६५) असे मृताचे नाव आहे. भीमराव यांना तीन मुले आहेत. थोडीबहुत शेती आहे. या शेतीच्या हिस्सेवाटणीवरूनच घरात कुरबुर सुरू होती. जिवंत असेपर्यंत शेतीची वाटणी होऊ देणार नाही, अशी भूमिका घोडाम यांची होती. ते खैरी येथील तलावाच्या बांधकामावर चौकीदार म्हणून काम करीत होते. नेहमीप्रमाणे रात्री ते साइटवर गेले. मनात राग असलेला त्यांचा लहान मुलगा हरिदास भीमराव घोडाम (२६) याने झोपेतच पित्यावर चाकूने वार केले. एकदा नव्हे, तर तब्बल ३० वेळा स्वत:च्या वडिलांचे शरीर भोसकून काढले. खुनाची घटना सकाळी उघड झाल्यानंतर कळंब पोलीस ठाण्यातील सहायक निरीक्षक अभय चौथनकर पथकासह घटनास्थळी पोहोचले.
घटनास्थळावरची स्थिती पाहून खुनाचे कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यातच घरगुती शेतीचा वाद असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी चौकशी केली. संशयित हरिदासला ताब्यात घेतले. त्याने खुनाची कबुली दिली. या प्रकरणी रुख्मा भीमराव घोडाम यांच्या तक्रारीवरून म्हणजेच आईने दिलेल्या तक्रारीवरून मुलाविरोधात कलम ३०२ भादंविनुसार कळंब पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अधिक तपास ठाणेदार अजित राठोड यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.