जमावाकडून वाहनांची तोडफोड

By Admin | Published: June 28, 2017 12:21 AM2017-06-28T00:21:11+5:302017-06-28T00:21:11+5:30

समाजाच्या भावना दुखावणारा मॅसेज सोशल मीडियावर टाकल्याने उमरखेड शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

Disruption of vehicles by the mob | जमावाकडून वाहनांची तोडफोड

जमावाकडून वाहनांची तोडफोड

googlenewsNext

उमरखेडमध्ये तणाव : व्हॉट्सअ‍ॅप मॅसेजने भावना दुखावल्याचा परिणाम
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : समाजाच्या भावना दुखावणारा मॅसेज सोशल मीडियावर टाकल्याने उमरखेड शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. जमावाने वाहनांची तोडफोड केल्याने परिस्थिती गंभीर झाली. यामुळे पोलिसांची जादा कुमक बोलविण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन अपर जिल्हा पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव यांनी केले आहे.
सोशल मीडियावर (व्हॉट्सअ‍ॅप) टाकलेल्या आक्षेपार्ह मजकुरासंदर्भात सोमवारी रात्री उशिरा पोलिसात तक्रार देण्यात आली. या आधारे मजकुर टाकणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. यात मुद्रांक विक्रेता सारनाथ रोकडे आणि नागापूर-रुपाळाचे पोलीस पाटील सदानंद तोडसे यांचा समावेश आहे. या कारवाईनंतर काही लोकांनी मंगळवारी दुपारी ३.३० च्या सुमारास ढाणकी रोडवर एमएच २६ एके ५८६४ या क्रमांकाच्या स्कॉर्पिओची तोडफोड केली. सदर वाहन उलटून देण्यात आले.
दुसरी घटना हुतात्मा चौकातील स्वामी मठाजवळ घडली. याठिकाणी उभी असलेली ह्युंडाई (एमएच २९ एआर ४१९७) सह एका मोटरसायकलची तोडफोड केली. यानंतर जमावाने एका घराला आपले लक्ष्य केले. दगडफेकीत एक व्यक्ती जमखी झाला. या घटनांमुळे शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद झाली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली.
उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस, उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल, तहसीलदार भगवान कांबळे हे परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन होते. दरम्यान अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव उमरखेडमध्ये दाखल झाले असून त्यांनी स्थितीचा आढावा घेतला. ते येथे तळ ठोकून आहेत. अफवांवर कुणीही विश्वास ठेऊन नये असे आवाहन अमरसिंह जाधव यांनी केले आहे. दरम्यान, दराटी, बिटरगाव, महागाव, पुसद, पोफाळी, वसंतनगर येथून पोलीस कुमक मागविण्यात आली.

२० दिवसांपूर्वीचा मॅसेज -अजय बन्सल
या प्रकरणी पुसदचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल (आयपीएस) यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, समाज भावना दुखविणारा हा मॅसेज २० दिवसांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर टाकण्यात आला होता. त्यावरून यवतमाळ येथील एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटकही करण्यात आली होती. तोच मॅसेज सोमवारी पोलीस पाटील सदानंद तोडसे व मुद्रांक विक्रेता सारनाथ रोकडे यांनी उमरखेड शहरातील अनेक ग्रृपवर टाकला. त्यामुळे तोडफोड आणि दगडफेकीची घटना घडली. याची गंभीर दखल घेत सखोल चौकशी सुरू आहे. नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, शांतता राखावी असे आवाहन अजयकुमार बन्सल यांनी केले आहे.

 

Web Title: Disruption of vehicles by the mob

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.