उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला सन्मानित
By admin | Published: March 11, 2016 02:53 AM2016-03-11T02:53:08+5:302016-03-11T02:53:08+5:30
सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम घेण्यात आले.
कळंब : सावरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले.
सुवर्ण कन्या योजनेंतर्गंत दोन मुलींवर कुंटुंब कल्याण शस्त्रक्रिया केल्याबद्दल परिसरातील सहा महिलांचा साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविकांनाही सन्मानित करण्यात आले. गरोदर माता व स्तनदा मातांची आरोग्य तपासणी करून त्यांना प्रोटीनयुक्त आहार देण्यात आला. यासोबतच किशोरींसाठी आरोग्य तपासणी शिबिरही घेण्यात आले. यावेळी किशोरी युवतींना त्यांच्या आरोग्याविषयी निगा व काळजी कशी घ्यावी याची सविस्तर माहिती देण्यात आली.
याच उपक्रमांतर्गंत प्रयोगशाळा तपासणीचा कार्यक्रमही घेण्यात आला. तत्पूर्वी गावातून शाळकरी विद्यार्थ्यांची रॅली काढून लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमाला सरपंच इंदुताई कोरले व मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगला उईके यांच्या मार्गदर्शनात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. (तालुका प्रतिनिधी)