दिग्रसमध्ये ‘विकेल ते पिकेल’ अंतर्गत शेतकऱ्यांना साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:42 AM2021-03-26T04:42:17+5:302021-03-26T04:42:17+5:30
दिग्रस : महाराष्ट्र शासनाच्या ‘विकेल ते पिकेल’ या धोरणांतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांना येथे विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. शासकीय योजनांचा ...
दिग्रस : महाराष्ट्र शासनाच्या ‘विकेल ते पिकेल’ या धोरणांतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांना येथे विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.
शासकीय योजनांचा व बाजारातील मागणीचा अभ्यास करून शेती उत्पादने पिकविल्यास शेतकऱ्यांना लाभ मिळेल. त्यात आपण उत्पादन करीत असलेला शेतमाल विक्री करण्याकरिता स्थानिक बाजारपेठ शोधण्याबरोबरच ज्याला जागतिक बाजारपेठेत मागणी आहे व ज्यापासून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळू शकेल, असे ‘विकेल ते पिकेल’ हे धोरण अंगीकार करून धोरणात्मक आराखडा तयार करण्याची शासनाची संकल्पना असून, या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन आमदार संजय राठोड यांनी केले.
सेंद्रिय शेती योजनेंतर्गत सेंद्रिय माल उत्पादक गट विठोली व लाख (रायजी) येथील शेतकरी गटांना कृषी विभागामार्फत सेंद्रिय माल वाहतुकीकरिता अनुदानित वाहन तसेच थेट शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना विक्रीकरिता आवश्यक साहित्याचे वाटप यावेळी आमदार राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.
बॉक्स
पुरवठ्याची साखळी, थेट विक्री व्यवस्था
शेतमालाच्या उत्पादकाला व ग्राहकाला काय हवे, याचा शोध घेऊन त्यानुसार पीक पद्धती, कृषी प्रक्रिया, पुरवठ्याची साखळी व विक्री व्यवस्था विकसित करणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना ‘विकेल ते पिकेल’ हे अभियान मदत करेल. त्यामुळे हा पॅटर्न जिल्ह्यात राबविल्या जात असल्याचे आमदार संजय राठोड यांनी सांगितले. यावेळी उत्तमराव ठवकर, तालुका कृषी अधिकारी एस.एस. राजपूत, मंडळ कृषी अधिकारी ए.डी. जाधव, आत्माचे एस.एस. बोंडे, शेतकरी गटातील प्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.