घाटंजी नगर परिषदेच्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:49 AM2021-03-01T04:49:52+5:302021-03-01T04:49:52+5:30
घाटंजी : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियान जनजागृतीसाठी नगर परिषदेच्या वतीने विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यांचे नुकतेच ...
घाटंजी : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियान जनजागृतीसाठी नगर परिषदेच्या वतीने विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यांचे नुकतेच बक्षीस वितरण करण्यात आले.
निबंध, चित्रकला व रांगोळी रेखाटन, पथनाट्य व लघुपट स्पर्धा, ऑडिओ क्लिप स्पर्धा आणि भित्तिचित्रे स्पर्धांचा समावेश होता. विविध शाळांनी व नागरिकांनी स्पर्धांना प्रतिसाद दिला. एकूण ७२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. निबंध स्पर्धेत ३ ते १४ वयोगटात निधी दर्शनवार प्रथम, जान्हवी शेंद्रे व्दितीय, तर श्रावणी ठाकरे हिने तृतीय क्रमांक पटकाविला. १५ ते ४५ वयोगटात निकिता ढवळे प्रथम, तर प्रफुल राऊत यांनी व्दितीय क्रमांक पटकाविला. चित्रकला व रांगोळी स्पर्धेत ३ ते १४ वयोगटात स्वरा भोयर, निधी दर्शनवार, दिशा शेंडे, तर १५ ते ४५ वयोगटामध्ये अनुश्री उपलेंचवार, राखी रामटेके व कोमल उपलेंचवार यांनी बाजी मारली.
पथनाट्य स्पर्धेत नटराज कला अकादमी मंच प्रथम, नवचैतन्य आर्ट ग्रुप व्दितीय, तर ओंकार कलामंदिरच्या चमूने तृतीय क्रमांक पटकाविला. भित्तिचित्रे स्पर्धेत स्वराज भगत यांनी प्रथम क्रमांक मिळवला. या सर्वांचा नगर परिषदेच्या वतीने १००१, ७०१ व ५०१, तसेच भित्तिचित्र स्पर्धेसाठी २००१, १५०१, १००१ रोख व प्रमाणपत्र देऊन नगराध्यक्ष नयना ठाकूर, मुख्याधिकारी अमोल माळकर, अधीक्षक भाऊ घोती, अभियंता राजू घोडके, आरोग्य सभापती अनिल खोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विभागप्रमुख राजू घोडके, शहर समन्वयक मिलिंद जोशी, आरोग्य निरीक्षक सागर ठाकरे आदींनी सहकार्य केले.