घाटंजीत वसुंधरा दिनानिमित्त पक्ष्यांसाठी जलपात्र वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:42 AM2021-04-24T04:42:53+5:302021-04-24T04:42:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क घाटंजी : वसुंंधरा दिनानिमित्त येथील नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेने पक्ष्यांसाठी मोफत जलपात्र वितरित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : वसुंंधरा दिनानिमित्त येथील नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेने पक्ष्यांसाठी मोफत जलपात्र वितरित केले.
वसुंधरेने मानवजातीला अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्यासोबतच मानसिक प्रसन्नता असे खूप काही दिले आहे. अशा वसुंधरेच्या पर्यावरणाचे संतुलन साधण्यासाठी झाडांबरोबरच प्राणी, पशुपक्षी यांचीही आवश्यकता आहे. वाढते उष्णतामान आणि पाण्यासाठी पक्ष्यांची होणारी धडपड पाहून ‘एक व्यक्ती, एक जलपात्र’ म्हणजेच प्रत्येक व्यक्तीने पक्ष्यांसाठी एक तरी जलपात्र ठेवून पक्ष्यांंना पाणी पिण्याची सोय उपलब्ध करून द्यायचे आहे. त्यासाठी येथील नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेने पक्ष्यांसाठी जलपात्र वितरण उपक्रम राबवला.
पक्ष्यांची तहान भागवणे म्हणजे एकप्रकारे वसुंधरा वाचविण्याचा प्रयत्नच आहे. हे वाटप केलेले जलपात्र आपल्या अंगणात, स्लॅबवर, झाडांवर आदी ठिकाणी ठेवून त्यात दररोज पाणी घालून पक्ष्यांना पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उपस्थित महिलांनी दिले. पक्ष्यांकरिता पाण्याची व्यवस्था करून भूतदया जोपासणे आणि पृथ्वीवरील पक्षी जातीचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नातून पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, हा उद्देश आहे. कोरोनाच्या भयावह वातावरणाची जाणीव ठेवून, सर्व नियमांचे पालन करून हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात ३० महिलांनी सहभाग घेतला. यावेळी संस्थाध्यक्ष स्वप्ना केशट्टीवार, उपाध्यक्ष पुष्पा नामोल्लीवार, सचिव पूजा उत्तरवार, संघटक माया यमसनवार, सदस्य नंदा मारावार, कविता इंगोले, अश्विनी भुरे, भाग्यश्री कोमावार, संध्या उपलेंचवार, रूपा कोमावार, अनिता पलिकुंडवार, मनिषा पद्मावार, संगीता भुरे, डॉ. सीमा बोंडे, विजया पाम्पट्टीवार आदी उपस्थित होत्या.