जिल्हाभर उमटले पडसाद

By admin | Published: June 2, 2014 01:46 AM2014-06-02T01:46:16+5:302014-06-02T01:46:16+5:30

पुणे येथे घडलेल्या घटनेचे यवतमाळ जिल्ह्यात रविवारी पडसाद उमटले.

The district is all over | जिल्हाभर उमटले पडसाद

जिल्हाभर उमटले पडसाद

Next

यवतमाळ : पुणे येथे घडलेल्या घटनेचे यवतमाळ जिल्ह्यात रविवारी पडसाद उमटले. यवतमाळ शहरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानांवर दगडफेक करण्यात आली. एका दुकानाच्या काचाही फोडण्यात आल्या. यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुख्य बाजारपेठही बंद करण्यात आली होती. तर वणी येथे काही काळ रास्ता रोको करण्यात आला. तर आर्णी येथे बाजारपेठ बंद करण्यात आली. पुसद, उमरखेड, दिग्रस, नेर येथे या घटनेचा निषेध करण्यात आला. पोलिसांनी सर्वत्र तगडा बंदोबस्त लावला होता.

यवतमाळ शहरात शिवसैनिकांचा जथ्था दुपारी १२ वाजताच्या सुमारास मुख्य बाजारपेठेत आला. व्यापार्‍यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येत होते. यावेळी इंदिरा गांधी मार्केटमधील जैन ब्रदर्स या इलेक्ट्रॉनिक्स दुकानावर दगडफेक झाली. त्यात शोरुमच्या काचा फुटल्या. तसेच दुकानाचे संचालक सुभाष जैन यांचा महागडा मोबाईलही निकामी झाला. या प्रकरणी राजू जैन यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

त्यानंतर शिवसैनिकांनी आपला मोर्चा गांधी चौकात वळविला. त्यावेळी पोलिसांनी या शिवसैनिकांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. शिवसैनिकांनी आम्हाला अटक करू नका, आम्ही तोडफोड करणार नाही, असे पोलिसांना सांगितले. मात्र पोलीस ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे मोठा जमाव झाला. त्यानंतर शिवसैनिकांनी मुख्य बाजारपेठ बंद पाडली. वीर वामनराव चौकातील एका दुकानावरही दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी २0 शिवसैनिकांना स्थानबद्ध केले. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, शहर अध्यक्ष पराग पिंपळे आणि विद्यार्थी सेनेचे संतोष ढवळे यांनी केले.

वणी येथे लालपुलिया आणि वरोरा बायपासजवळ शिवसैनिकांनी रस्ता रोको करून घटनेचा निषेध केला. यावेळी १५ शिवसैनिकांना स्थानबद्ध करण्यात आले. नेर येथील शिवसैनिकांनी या घटनेचा निषेध केला. पोलिसांनी सकाळीच ३0 जणांना स्थानबद्ध केले होते. नेर तालुक्यातील उत्तरवाढोणा येथे शिवसैनिकांनी दोन तास रस्ता रोको केला. महागाव येथे या घटनेच्या निषेधार्थ तहसीलदारांना भाजपा तसेच महागाव तालुका मनसेतर्फे निवेदन देण्यात आले. पुणे येथील घडलेल्या घटनेचा निषेध करून पुसद येथे शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बिरसा मुंडा ब्रिगेड, शिवसेना यासह विविध सामाजिक संघटनांनी केली. आर्णी येथे शिवसेनेने बंद पुकारला. संपूर्ण मार्केट बंद करण्यात आले होते. तसेच समाजकंटकाचा निषेध करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. बंद दरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब मुनगिनवार, तालुका प्रमुख रवी राठोड, संजय उपलेंचवार, शहर प्रमुख रमेश ठाकरे, युवा सेनेचे नीलेश मस्के, नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण मुनगिनवार यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षर्‍या आहेत. दिग्रस तालुका व शहर शिवसेनेच्यावतीने पोलिसांना निवेदन देऊन कारवाईची मागणी करण्यात आली. या वेळी शिवसेना तालुका प्रमुख राजकुमार वानखडे, शहर प्रमुख संजीव चोपडे, माजी नगराध्यक्ष रवींद्र अरगडे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. (लोकमत चमू)

Web Title: The district is all over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.