जिल्हा बँकेच्या सीईओंना सहनिबंधकांकडून ३१ ला समक्ष पाचारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 05:00 AM2021-03-26T05:00:00+5:302021-03-25T23:30:02+5:30
विभागीय सहनिबंधकांनी दोन-तीन मुद्यांवर माहिती मागितली आहे. त्यात आर्णी शाखेतील गैरव्यवहाराबाबत अंतर्गत लेखापरीक्षण अहवाल मागण्यात आला आहे. मात्र, बँकेने अद्याप अंतर्गत ऑडिट केले नसल्याची माहिती आहे. थेट त्रयस्थ ‘सीए’चीच नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे सीएंचा प्राथमिक अहवाल सादर केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नोकरभरती हा प्रमुख मुद्दा सहनिबंधकांनी उपस्थित केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्णी शाखेतील गाजत असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अपहारप्रकरणाची अमरावतीचे विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था) राजेश दाभेराव यांनी दखल घेतली आहे. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बुधवारी (दि. ३१ मार्च) दुपारी १२ वाजता समक्ष हजर राहण्याचे आदेश २३ मार्च रोजी जारी केले आहे.
विभागीय सहनिबंधकांनी दोन-तीन मुद्यांवर माहिती मागितली आहे. त्यात आर्णी शाखेतील गैरव्यवहाराबाबत अंतर्गत लेखापरीक्षण अहवाल मागण्यात आला आहे. मात्र, बँकेने अद्याप अंतर्गत ऑडिट केले नसल्याची माहिती आहे. थेट त्रयस्थ ‘सीए’चीच नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे सीएंचा प्राथमिक अहवाल सादर केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नोकरभरती हा प्रमुख मुद्दा सहनिबंधकांनी उपस्थित केला आहे. बँकेने नोकरभरती प्रक्रिया राबविली, त्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे या भरतीचा सद्य:स्थितीदर्शक अहवाल मागण्यात आला आहे. शिवाय कंत्राटी पदाच्या भरतीकरिता ३ मार्च रोजी जाहिरात दिली गेली, त्याचीही माहिती मागितली गेली आहे. लिपिक व शिपायाच्या १०५ जागांची अंतिम निवड यादी, मागासवर्गीयांच्या ४२ जागांच्या भरती प्रक्रियेसाठी एजन्सी नेमणे आणि दीडशेपेक्षा अधिक कंत्राटी पदांच्या भरतीच्या अनुषंगाने सीईओंना आपला अहवाल सहनिबंधकांना सादर करावा लागणार आहे.
बँकेच्या संचालक मंडळाची आज बैठक
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक आज, शुक्रवारी (दि. २६) होत आहे. या बैठकीकडे भरतीतील उमेदवार व त्यांच्या पालकांच्या नजरा लागल्या आहेत. १०५ जागांची अंतिम निवड यादी जारी करण्याबाबतचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे. मात्र, या भरतीला ब्रेक लावता येतो का याची अखेरची चाचपणी करण्यासाठी जिल्हा बँकेच्या पाच संचालकांनी नुकतीच नागपूरवारी केल्याची माहिती आहे. शुक्रवारच्या बैठकीत ठोस काही निर्णय होतो, की यादी आणखी लांबणीवर पडते याकडे नजरा आहेत. ४ एप्रिलपूर्वी ही यादी जाहीर होणे अपेक्षित आहे. कारण बँकेने तशी हमी उच्च न्यायालयात दिली आहे.
आरोपींची अटक आणखी किती दिवस टळणार
आर्णी : जिल्हा बँकेच्या आर्णी शाखेतील कोट्यवधी रुपयांच्या अपहारप्रकरणी अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही. आर्णी पोलिसांनी या अटकेसाठी फारसा इन्टरेस्ट दाखविला नाही. या प्रकरणाचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. अटक टाळण्यासाठी आरोपींनी प्रयत्न चालविले आहेत. अटकपूर्व जामिनासाठीही चाचपणी केली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखा आरोपींना आणखी किती दिवस मोकळे फिरू देते याकडे आर्णीतील फसवणूक झालेल्या खातेदारांच्या नजरा लागल्या आहेत. आरोपी गावातच फिरत असताना आणि मोबाईलद्वारे त्यांचे लोकेशन घेणे शक्य असताना अटकेला विलंब का याचे रहस्य उलगडलेले नाही.