जिल्हा बँकेची परीक्षा ऐनवेळी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 09:48 PM2019-06-20T21:48:05+5:302019-06-20T21:48:53+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीची बहुप्रतीक्षित परीक्षा गुरूवारी आॅनलाईन सुरू होणार होती. मात्र ऐनवेळी पेपर रद्द करण्यात आला. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन परीक्षा घेणारी एजंसी आणि परीक्षा मंडळाविरुद्ध रोष व्यक्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पदभरतीची बहुप्रतीक्षित परीक्षा गुरूवारी आॅनलाईन सुरू होणार होती. मात्र ऐनवेळी पेपर रद्द करण्यात आला. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन परीक्षा घेणारी एजंसी आणि परीक्षा मंडळाविरुद्ध रोष व्यक्त केला.
कनिष्ठ लिपिक आणि शिपायाच्या १४७ जागांसाठी सात हजार उमेदवारांनी अर्ज केले. २० ते २३ जूनपर्यंत परीक्षेचा कार्यक्रम अमरावतीच्या एमएच-एसआयटी कंपनीकडे सोपविण्यात आला. २० जूनचा १६०० विद्यार्थ्यांचा पेपर नंदूरकर महाविद्यालयात होता. मात्र या केंद्रावर विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशी आसन व्यवस्था नसल्याने व नेटवर्क समस्येमुळे ऐनवेळी पेपर रद्द करण्यात आला. ९ वाजताचा पेपर आणि विद्यार्थ्यांना ९.३७ वाजता रद्दचे एसएमएस आले. एकूणच गोंधळ लक्षात घेता बँकेने २३ जूनपर्यंतचे सर्वच पेपर रद्द केले. या प्रकाराने विद्यार्थी चांगलेच संतापले. धास्तावलेल्या परीक्षा मंडळाने पोलीस बोलावले. नंतर पेपर रद्द का झाला याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यानंतरही विद्यार्थ्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. जिल्हाधिकाऱ्यांनी उपजिल्हा निबंधकांशी संपर्क करून रद्द झालेले पेपर तत्काळ घेण्याच्या सूचना दिल्या.
२० ते २३ जूनचा आॅनलाईन परीक्षेचा कार्यक्रम तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आला आहे. तांत्रिक दोष दुरुस्तीनंतर या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याचे परीक्षा एजंसीने बँकेला कळविले आहे.
- अरविंद देशपांडे, सीईओ, बँक.
विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड
परीक्षेसाठी पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, अमरावती आदी जिल्ह्यांतून उमेदवार आले होते. अनेकांचा बुधवारी रात्रीपासूनच मुक्काम होता. मात्र ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड पडला.