जिल्हा बँकेचे २४ हजार शेतकरी कर्जाला मुकणार
By admin | Published: August 29, 2016 12:53 AM2016-08-29T00:53:07+5:302016-08-29T00:53:07+5:30
खरीप कर्ज वितरणाची अंतिम मुदत अवघ्या दोन दिवसावर आली असताना २४ हजार पात्र शेतकऱ्यांना अद्यापही जिल्हा बँकेतून कर्ज मिळाले नाही.
३१ आॅगस्ट अंतिम मुदत : कर्ज पुनर्गठनासाठी हवे ६३ कोटी
यवतमाळ : खरीप कर्ज वितरणाची अंतिम मुदत अवघ्या दोन दिवसावर आली असताना २४ हजार पात्र शेतकऱ्यांना अद्यापही जिल्हा बँकेतून कर्ज मिळाले नाही. या दोन दिवसात शासनाकडून निधी येण्याची सूतराम शक्यता नसल्याने या शेतकऱ्यांना हक्काच्या कर्जाला मुकावे लागेल. जिल्हा बँकेची ही स्थिती असताना राष्ट्रीयकृत बँकांबाबत तर कुणी बोलायलाही तयार नाही.
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुलभ कर्ज मिळावे म्हणून सुरुवातीपासूनच प्रशासनाने कठोर भूमिका घेतली. कर्ज वितरण मेळाव्यासह जिल्हाधिकाऱ्यांनी दर १५ दिवसाला आढावा घेतला असे असतानाही १७०० कोटी रुपयांच्या उद्दीष्टांपैकी आतापर्यंत केवळ ६२ टक्के कर्ज वितरण करण्यात आले. एक लाख ४७ हजार शेतकऱ्यांना एक हजार ६५ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले. मात्र १५ आॅगस्टपासून बँकांनी कर्ज वितरण थांबविले आहे. त्यात जिल्हा बँकेचाही समावेश आहे. शेतकऱ्याची बँक असलेल्या जिल्हा बँकेत कर्जपुनर्गठनासाठी २४ हजार शेतकरी पात्र ठरले. या सभासदांच्या कर्जपुनर्गनासाठी ६३ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. जिल्हा प्रशासनाने वारंवार पाठपुरावा केला. मात्र २८ आॅगस्टपर्यंत पैसेच पोहोचले नाही. वरिष्ठ पातळीवरही याबाबत कुठल्याही हालचाली दिसत नाही. अशातच कर्ज वितरणाची अंतिम मुदत ही ३१ आॅगस्ट आहे. अवघ्या दोन दिवसावर अंतिम मुदत आली असताना शेतकऱ्यांना आता कर्जाला मुकावे लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ६३ कोटी रुपये वितरित करताना १५ टक्के वाटा राज्य शासन भरणार आहे.
राज्य शासनाचा वाटा आल्यानंतर नाबार्ड ६० टक्के आणि राज्य बँक १० टक्के वाटा देते. जिल्हा बँक १० टक्के स्वनिधी देतो. परंतु राज्य शासनाने आपला वाटा अंतिम मुदत जवळ आली तरी अद्यापही जमा केला नाही. त्यामुळे इतर निधीही जिल्हा बँकेकडे वळता झाला नाही. उर्वरित दोन दिवसात ही प्रक्रिया करणे अवघड आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले असून पोळ्याच्या तोंडावर तरी कर्ज मिळेल, अशी अपेक्षाही फोल ठरत आहे. आता काय होते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले.(शहर वार्ताहर)