जिल्हा बँकेच्या नोकरभरतीची एजंसी सोमवारी ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 10:09 PM2019-02-05T22:09:26+5:302019-02-05T22:10:10+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीची एजंसी ठरविण्यासाठी सोमवार ११ फेब्रुवारी रोजी बँकेची बैठक होणार आहे. जिल्हा बँकेत लिपिकाच्या १३३ व शिपायाच्या १४ अशा १४७ जागांची नोकरभरती घेतली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीची एजंसी ठरविण्यासाठी सोमवार ११ फेब्रुवारी रोजी बँकेची बैठक होणार आहे.
जिल्हा बँकेत लिपिकाच्या १३३ व शिपायाच्या १४ अशा १४७ जागांची नोकरभरती घेतली जाणार आहे. आॅनलाईन पद्धतीने होणाऱ्या या नोकरभरतीसाठी इच्छुक संस्थांची यादी मागण्यात आली होती. याबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत एजंसीजची गुणवत्ता, पारदर्शकता व अनुभव यावर चर्चा झाली. त्यानुसार नऊ पैकी चार संस्था आॅनलाईन भरती प्रक्रियेसाठी अपात्र असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. त्यामुळे उर्वरित पाच संस्थांना ११ फेब्रुवारी रोजी पाचारण करण्याचा निर्णय झाला. शासनाच्या निकषानुसार या पाच पैकी तीनच पात्र ठरण्याची शक्यता आहे. कारण उर्वरित दोन संस्थांनी अनुभवाचे सबळ पुरावे जोडलेले नाहीत. पात्र ठरणाºया तीन पैकी दोन संस्थांनी ही भरतीप्रक्रिया राबविण्यास फारसा इंटरेस्ट दाखविलेला नाही. मात्र भरतीची संस्था नेमकी कोण असेल याचा निर्णय ११ फेब्रुवारीला घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मंगळवारच्या बैठकीत बँकेतील अन्य विषयांवरही चर्चा झाली. या नोकरभरतीकडून संचालकांना मोठ्या ‘उलाढाली’च्या अपेक्षा होत्या. या भरतीतील ‘एनर्जी’ प्रत्यक्ष बँकेच्या आगामी होणाºया निवडणुकीत खर्च करण्याचा मनसुबा होता. परंतु शासनाचे काटेकोर निकष व आॅनलाईन भरतीत कोणताही गोंधळ करण्यास एजंसीजची असमर्थता यामुळे त्या संचालकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.