जिल्हा सहकारी बँकेला आग, ४० संगणक जळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 11:30 PM2019-05-09T23:30:38+5:302019-05-09T23:31:41+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या येथील पाचकंदील चौक स्थित मुख्य कार्यालयाच्या इमारतीत रात्री १ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत कृषी व लेखा विभागातील ४० संगणक व पीक कर्जाचे बरेच रेकॉर्ड जळून खाक झाल्याचे सांगितले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या येथील पाचकंदील चौक स्थित मुख्य कार्यालयाच्या इमारतीत रात्री १ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत कृषी व लेखा विभागातील ४० संगणक व पीक कर्जाचे बरेच रेकॉर्ड जळून खाक झाल्याचे सांगितले जाते.
गुरुवारच्या रात्री जिल्हा बँकेतील शेती कर्ज व बँकींग विभागातून धूर निघत असल्याचे सुरक्षा रक्षक व संगणक कंपनी कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच याची सूचना बाजूलाच असलेल्या शहर पोलीस ठाणे व अग्नीशमन विभागाला दिली. नगरपरिषदेच्या अग्नीशमन विभागाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आग विझविणे सुरू केले. मात्र जुने रेकॉर्ड, फर्निचर, कापडी पडदे यामुळे आग विझविण्यास काहीसा वेळ लागला. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पार्किंग होताना आढळून आले. ४० संगणक व अन्य साहित्य जळून खाक झाले. या आगीत ४० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
नोकरभरती, वादग्रस्त कर्जप्रकरणांमुळे घातपाताची चर्चा
- जिल्हा बँकेत आग लागल्याचे वृत्त कळताच आग लागली की लावली, असा प्रश्न करीत घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. कारण जिल्हा बँकेमध्ये १४७ पदांची नोकरभरती होणार आहे. याशिवाय बँकेतील भ्रष्टाचार, पैशाची उधळपट्टी, वारेमाप खर्च, बोगस कर्ज प्रकरणे हे विषय नेहमीच चर्चेत राहतात. या वादग्रस्त प्रकरणांचे रेकॉर्ड जाळून पुरावे नष्ट करण्यासाठी तर ही आग लावली गेली नाही ना? असा शंकेचा सूर दिवसभर शहरात व विशेषत: बँकेच्या परिसरात ऐकायला मिळाला. परंतु जिल्हा बँकेच्या व्यवस्थापनाने व प्रशासनाने घातपाताची शक्यता फेटाळून लावली आहे. कर्जाचे रेकॉर्ड सेवा संस्थांकडेही उपलब्ध असते. नोकरभरतीला अद्याप सुरुवातच झाली नाही. या नोकरभरतीचा बँकेचा थेट संबंध नाही. त्याचे संपूर्ण रेकॉर्ड आॅनलाईन परीक्षा घेणाºया खासगी संस्थेकडे असल्याने संशयाला कोणतीही जागा नसल्याचे बँकेने स्पष्ट केले.
अग्नीरोधक यंत्रे उपलब्ध नाही
जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयांमधील अग्नीशमन यंत्रणा रामभरोसे असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २९ एप्रिलच्या अंकात प्रकाशित केले होते. त्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतही अग्नीरोधकासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र या इशाºयाकडे बँकेचे पदाधिकारी, प्रशासक व व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले. हा इशारा गांभीर्याने न घेतल्याने अखेर बँकेला आगीच्या घटनेला सामोरे जावे लागले. त्यात झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण?, ही वसुली कुणाकडून करायची असा प्रश्न विचारला जात आहे.
बँकेला लागलेल्या आगीत आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र महत्वाचे रेकॉर्ड सुरक्षित आहे. ही आग शॉर्टसर्किटनेच लागली आहे. या आगीचा बँकेच्या नियमित कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही. सर्व व्यवहार सुरळीत आहे. ग्राहक-सभासदांनी भीती बाळगण्याचे कारण नाही.
- अमन गावंडे, अध्यक्ष,
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.