पीक कापणीसाठी जिल्हाधिकारी प्रत्यक्ष शेतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 10:26 PM2018-09-02T22:26:31+5:302018-09-02T22:27:06+5:30
हंगामात नेमके किती उत्पादन होणार, याचा अंदाज बांधण्यासाठी पीक कापणी प्रयोग केला जातो. ही प्रक्रिया पूर्वी चावडीत बसूनच पूर्ण केली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होऊनही पीक विमा व शासकीय मदतीला मुकावे लागत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : हंगामात नेमके किती उत्पादन होणार, याचा अंदाज बांधण्यासाठी पीक कापणी प्रयोग केला जातो. ही प्रक्रिया पूर्वी चावडीत बसूनच पूर्ण केली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होऊनही पीक विमा व शासकीय मदतीला मुकावे लागत होते. हे टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी रविवारी स्वत: शेतात जाऊन पीक कापणी प्रयोग केला. यावेळी महसूल व कृषी यंत्रणेचे सर्वच प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
दारव्हा तालुक्यातील उजोणा येथील शेतकरी शशीधर उकंडा जाधव यांच्या शेत सर्व्हे नंबर ५५ मध्ये मुगाची पीक कापणी केली. उत्पादनाचा अंदाज ठरविण्यासाठी प्रत्येक गावात पीक कापणी समिती आहे. हा कार्यक्रम महसूल व कृषी विभाग संयुक्तपणे राबवितो. मात्र या समित्यांमधील प्रशासकीय यंत्रणा काम प्रामाणिकपणे करत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना उत्पादन कमी होऊनही मदतीपासून वंचित राहावे लागत होते. चुकीच्या पीक कापणीतून पैसेवारीचे गणित चुकत होते.
याला आळा घालण्यासाठी रविवारी जिल्हाधिकारी स्वत: मूग पिकाचा कापणी प्रयोग करण्यासाठी शेतात गेले. त्यांच्यासोबत अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी नागनाथ कोपळकर उपस्थित होते. मुगाच्या शेंगाची तोडणी करून त्याचे वजन करण्यात आले. सरासरी उत्पन्नाचे निकष ठरले आहेत. जिल्हाधिकाºयांनी केलेल्या कापणी प्रयोगात मुगाचे यावर्षी सरासरी इतके उत्पन्न होईल, असे प्राथमिक स्वरूपात स्पष्ट झाले. मात्र अंतिम पैसेवारीतून उत्पन्नाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
अधिकाऱ्यांना निर्देश
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्वत: पीक कापणी प्रयोग करून यंत्रणेला कृतीयुक्त इशारा दिला. त्यासोबतच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी यांनीही शक्य होईल तितक्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोग करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.