जिल्हा काँग्रेस कमिटीला अखेर ‘प्रभारी अध्यक्ष’
By admin | Published: May 4, 2017 12:17 AM2017-05-04T00:17:41+5:302017-05-04T00:17:41+5:30
जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षपदाचा वाद गटबाजीमुळे मिटत नसल्याने अखेर प्रभारी अध्यक्ष देऊन या वादातून तोडगा काढला गेला.
वजाहत मिर्झा : गटबाजीवर असाही तोडगा
यवतमाळ : जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षपदाचा वाद गटबाजीमुळे मिटत नसल्याने अखेर प्रभारी अध्यक्ष देऊन या वादातून तोडगा काढला गेला.
पुसदचे डॉ.वजाहत मिर्झा यांची जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. डॉ.मिर्झा प्रदेश चिटणीसही आहेत. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद माजी आमदार वामनराव कासावार यांच्याकडे होते. परंतु त्यांच्या काळात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाची वाताहत झाली, म्हणून त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागेवर नवा अध्यक्ष कोण? याचा निर्णय गेल्या दीड-दोन वर्षांत होऊ शकला नाही.
अध्यक्षपदासाठी माजी मंत्री प्रा.वसंत पुरके, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांची नावे आघाडीवर होती. याशिवाय इतर काहींचेही छुपे प्रयत्न सुरू होते. परंतु एक नाव विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या गटाकडून तर दुसरे नाव माजी मंत्री अॅड.शिवाजीराव मोघे यांच्या गटाकडून रेटले गेल्याने प्रदेश काँग्रेसला या गटबाजीत ठोस निर्णय घेता आला नाही. या वादात जिल्ह्यातील नगरपंचायत, नगरपरिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समित्या या निवडणुका काँग्रेस पक्ष अध्यक्षांशिवाय लढला. त्यात काँग्रेसचे पानीपत झाले. पक्ष संपायला येवूनही गटबाजी संपत नसल्याने प्रदेश काँग्रेसनेही जिल्ह्यातील या गटबाजीच्या राजकारणापुढे हात टेकले आहे. अजूनही अध्यक्षपदाचा निर्णय होत नसल्याचे पाहून बुधवारी अखेर प्रदेश काँग्रेसने यवतमाळ जिल्ह्याला तूर्त प्रभारी अध्यक्ष दिला आहे.
पुसद येथील डॉ.वजाहत मिर्झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही गटांशी जुळवून घेतल्यास आणि पक्षसंघटन बांधणीत परफॉर्मन्स दिसल्यास डॉ.मिर्झा यांनाच पूर्णवेळ जिल्हाध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(जिल्हा प्रतिनिधी)