जिल्हा परिषद गट आणि गणांच्या रचनेला सुरुवात
By admin | Published: September 5, 2016 01:06 AM2016-09-05T01:06:20+5:302016-09-05T01:06:20+5:30
जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांच्या रचनेने आता वेग घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाने गट आणि गणांची प्रारूप रचना
जिल्हा परिषद : ९ सप्टेंबरला होणार प्रस्ताव सादर
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या गट आणि गणांच्या रचनेने आता वेग घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाने गट आणि गणांची प्रारूप रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर प्रत्यक्षात प्रभाग रचनेला सुरूवात झाली आहे.
येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. मागील निवडणूक २००१ च्या जनगणनेनुसार झाली होती. मात्र यावेळी होणारी निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार होणार अहे. त्यापूर्वी जिल्ह्यातील आठ नगरपरिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे. ९ सप्टेंबरपर्यंत आरक्षणाच्या जागेसह प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर होणार आहे.
या प्रारूप प्रभाग रचनेत जिल्हा परिषदेचा गट आणि पंचायत समिती गणांची रचना निश्चित होणार आहे. तसेच संंबंधित गट आणि गणांचे प्रवर्गनिहाय आरक्षणही निश्चित होणार आहे. त्यामुळे या प्रारूप प्रभाग रचनेकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. २३ सप्टेंबरला विभागीय आयुक्त या प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देतील. त्यानंतर जिल्हाधिकारी आरक्षण सोडतीची सूचना प्रसिद्ध करून ओबीसी, अनुसूचित जाती, जमाती व सर्व प्रवर्गातील महिलांचे आरक्षण निश्चित करणार आहे.
या प्रक्रियेनंतर ५ आॅक्टोबरला गट व गणांची आरक्षण सोडत जाहीर होणार आहे. १० आॅक्टोबरला जिल्हाधिकारी गट, तर संबंधित तहसीलदार गण रचना व आरक्षणासह प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना काढणार आहे. त्यावर नागरिकांना २० आॅक्टोबरपर्यंत हरकती व सूचना सादर करता येणार आहे. प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी झाल्यानंतर विभागीय आयुक्त १७ नोव्हेंबरला गट व गणांची अंतिम रचना जाहीर करणार आहे. त्यासाठी जिल्हा निवडणूक विभाग कामाला लागला आहे. (शहर प्रतिनिधी)
इच्छुकांसह नागरिकांना उत्सुकता
९ सप्टेंबरपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव सादर करावयाचा असल्याने येथील निवडणूक विभागात सध्या जोरदार तयारी सुरू आहे. सॅटेलाईटव्दारे प्रभाग रचनेसाठी कार्यालय सज्ज झाले आहे. त्यामुळे निवडणूक विभागात हलचल वाढली. संभाव्य इच्छुकही या कार्यालयात येरझारा घालताना दिसतात. जिल्ह्याच्या विविध तालुक्यांतील नागरिक, संभाव्य उमेदवार प्रारूप प्रभाग रचना नेमकी कशी होणार, याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे. प्रारूप प्रभाग रचना सोयीची व्हावी, गट आणि गणात सोयीची गावे समाविष्ट व्हावी, यासाठी इच्छुकांची धावपळ सुरू आहे. मात्र ही रचना अत्याधुनिक सॅटेलाईट पद्धतीने होणार असल्याने कुणालाही त्यात बदल करण्याची संधी मिळण्याची शक्यता मावळली आहे.