जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या चार दिवसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 10:08 PM2018-05-14T22:08:41+5:302018-05-14T22:09:16+5:30
तीन वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांसाठी खूशखबर आहे. शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश येत्या तीन दिवसात धडकणार असून दुसऱ्याच दिवशी त्यांना नव्या शाळेत रूजू व्हावे लागेल, असे संकेत शिक्षण विभागातून मिळाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : तीन वर्षांपासून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांसाठी खूशखबर आहे. शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश येत्या तीन दिवसात धडकणार असून दुसऱ्याच दिवशी त्यांना नव्या शाळेत रूजू व्हावे लागेल, असे संकेत शिक्षण विभागातून मिळाले आहेत. विशेष म्हणजे, एकंदर आठ हजार शिक्षकांपैकी चार हजार जणांच्या बदल्या होण्याची शक्यता असून ही शिक्षण क्षेत्रासाठी मोठी उलथापालथ ठरणार आहे.
जिल्हा परिषदेत सध्या विविध विभागातील ‘क’ वर्गीय कर्मचाºयांच्या बदल्यांची प्रक्रिया ९ मेपासून सुरू झाली आहे. सीईओंनी आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया १५ मेपर्यंत संपविण्यात येणार असून शेवटचा दिवस शिक्षण विभागासाठी राखून ठेवण्यात आला आहे. परंतु, शिक्षण विभागातील ‘क’वर्गातील कर्मचारी असलेल्या शिक्षकांचे बदली आदेश राज्यस्तराहून येणार आहेत. हे आदेश येण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस लागतील, अशी शक्यता शिक्षणाधिकाºयांनी वर्तविली आहे.
ग्रामविकास मंत्रालयाच्या स्तरावरून राज्यातील शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ११ मे रोजी धुळे आणि बुलडाणा जिल्ह्यातील शिक्षकांचे बदली आदेश तेथील सीईओंना पाठविण्यात आले. तर १२ मे रोजी जळगाव, सातारा, वाशिम, कोल्हापूर, सोलापूर जिल्हा परिषदांनाही बदली आदेश मिळाले आहेत. तर यवतमाळसह इतर जिल्ह्यांचे आदेश लवकरच पाठविण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले आहे.
बदली प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने पूर्वतयारी सुरू केली आहे. राज्यस्तरावरून आदेश येताच शिक्षकांना कार्यमुक्त करावे लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी भरलेला मूळ अर्ज, त्यात संवर्ग एकमधून लाभ घेतला असल्यास संबंधित पुरावे, असे सर्व दस्तावेज शिक्षणाधिकाºयांनी मागविले आहेत. प्रत्येक शिक्षकाचे असे दस्तावेज गोळा करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर एका कर्मचाºयाची खास नियुक्ती करण्यात आली आहे. हे दस्तावेज १५ मेपर्यंत तातडीने मागविण्यात आले आहे. बदलीचा आदेश मिळताच शिक्षक कार्यमुक्त होणार असून दुसºयाच दिवशी त्यांना नव्या शाळेत रूजू झाल्याचा अहवाल द्यावा लागणार आहे.
पोळा, दसरा, दिवाळी हुकली... धोंड्याचा महिना सार्थकी
फेब्रुवारी २०१७ पासून शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया ‘पाईपलाईन’मध्ये होती. यादरम्यान, कधी पोळ्याच्या दिवशी आदेश येणार तर कधी दसऱ्याच्या दिवशी आदेश धडकणार, अशा वावड्या उठत राहिल्या. पण त्या फोल ठरल्या. दिवाळीच्या सुट्यांमध्ये बदल्यांची प्रक्रिया पूर्णत्वास जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. मात्र, ऐनवेळी बदल्याच स्थगित झाल्या होत्या. पोळा, दसरा, दिवाळी असे मुहूर्त हुकले. मात्र आता धोंड्याच्या महिन्यात बदल्या पूर्णत्वास जात आहेत.
बोगस लाभार्थी जाणार ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये
आॅनलाईन अर्जात एखाद्या शिक्षकाने खोटी माहिती भरलेली आढळल्यास त्याची बदली रद्द करण्याचे आदेश आहेत. त्याला मूळ शाळेत पदस्थापना न देता पूर्ण बदली प्रक्रिया झाल्यावर शिल्लक राहिलेल्या अवघड क्षेत्रातील शाळेत बदली केली जाणार. शिस्तभंगाची कारवाई करून त्याच्या दोन वेतनवाढीही रोखण्यात येणार आहे. त्याला ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकून पुढील पाच वर्षे त्याला बदली प्रक्रियेत अर्ज भरण्यास अपात्र ठरविले जाणार आहे.
दोन-दोन दिवसांच्या अंतराने विविध जिल्ह्यांचे बदली आदेश पाठविले जात आहे. धुळे, बुलडाणा जिल्हा परिषदांना बदल्यांचे आदेश मिळाले आहेत. येत्या ३-४ दिवसात यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्यांचेही आदेश येतील.
-डॉ. सुचिता पाटेकर, शिक्षणाधिकारी, यवतमाळ