महागाव तालुक्यातील गुन्हेगारांची कुंडली जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या दरबारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:44 AM2021-05-07T04:44:14+5:302021-05-07T04:44:14+5:30
ज्ञानेश्वर ठाकरे महागाव : एकापेक्षा अनेक गुन्हे शिरावर असलेल्या १०१ गुन्हेगारांची कुंडली जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या दरबारात पोहोचली आहे. पोलीस ...
ज्ञानेश्वर ठाकरे
महागाव : एकापेक्षा अनेक गुन्हे शिरावर असलेल्या १०१ गुन्हेगारांची कुंडली जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या दरबारात पोहोचली आहे. पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना अशा गुन्हेगारांची यादी मागविली होती.
एकापेक्षा अनेक गुन्हे शिरावर असलेल्या गुन्हेगारांची माहिती देणे पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी बंधनकारक केले होते. त्यानुसार महागाव पोलीस ठाण्यांतर्गत घडलेल्या गुन्ह्यांची माहिती येथील ठाणेदार विलास चव्हाण यांनी सादर केल्याची माहिती आहे. तालुक्यातील गुन्हेगारांची कुंडली जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पोहोचल्याने अनेकांना आता घाम फुटला आहे.
तालुक्यातील गुन्हेगारीचा आलेख पाहता यावेळी तडीपारांची मोठी संख्या असण्याची शक्यता आहे. गंभीर गुह्यांसह जबरी चोऱ्या, अवैध दारू यांसह राजकारण्यांनी आपल्या पदांचा केलेला गैरवापर व त्यांच्यावरील गुन्हे लक्षात घेता नेमकी कोणती कारवाई होते, ही येणारी वेळच सांगेल. तालुक्याची गुन्हेगारी जिल्ह्यात कुप्रसिद्ध आहे. मागील काळात घडलेल्या अनेक गुन्ह्यांचा गोषवारा जिल्ह्याला पोहोचल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका वाढला आहे. आता तडीपारांची यादी जाहीर कधी होते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्या कारवाईकडे लक्ष केंद्रित झाले आहे. सर्व गुन्ह्यांचा हिशेब जिल्हा पोलीस अधीक्षक घेणार असल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
बॉक्स
१७ जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव
येथील पोलिसांनी तब्बल १०१ गुन्हेगारांची यादी पाठविल्याची माहिती आहे. त्यात मालमत्तेसंबंधी गुन्हे करणाऱ्या १७ गुन्हेगारांच्या तडीपारीचा प्रस्ताव सादर केल्याची विश्वसनीय माहिती आहे. याशिवाय शरीरविषयी गुन्हे करणाऱ्या ३० गुन्हेगारांची आणि जुगार खेळताना वारंवार पकडल्या जाणाऱ्या २० जुगाऱ्यांची नावे यात समाविष्ट आहेत. तसेच दारूबंदीसंदर्भात तब्बल ३४ गुन्हेगारांची नावे सादर करण्यात आली असून, त्यांच्यावर विविध कारवाया होण्याची दाट शक्यता आहे.
कोट
जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करून आम्ही तालुक्यातील गुन्हेगारांची यादी पाठविली. यात एकापेक्षा अनेक गुन्हे असलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. लवकरच या संदर्भात सूचना मिळतील.
विलास चव्हाण,
ठाणेदार महागाव.