जिल्ह्याला ४० कोटी मिळाले
By admin | Published: February 22, 2017 01:15 AM2017-02-22T01:15:42+5:302017-02-22T01:15:42+5:30
प्रमुख खनिज व गौण खनिजाच्या रॉयल्टीतून राज्याला मिळालेल्या निधीतील वाट्यापोटी जिल्ह्याला वर्षभरात
खनिज विकास निधी : खर्चाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला
यवतमाळ : प्रमुख खनिज व गौण खनिजाच्या रॉयल्टीतून राज्याला मिळालेल्या निधीतील वाट्यापोटी जिल्ह्याला वर्षभरात ४० कोटींचा निधी मिळाला. हा निधी विविध विकास कामांवर खर्च करण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळताच विकास कामांना सुरूवात होणार आहे.
जिल्ह्यात कोळसा खाणी, रेती घाट, डोलोमाईट, चुनाभट्ट्या, मुरूम आदी गौण खनिजे आहेत. त्यांची रॉयल्टी वसूल केली जाते. ही रॉयल्टी शासनाच्या तिजोरीत जमा केली जाते. दरवर्षी राज्याला या माध्यमातून जिल्ह्यातून जवळपास २०० कोटीचा निधी प्राप्त होतो. या जमा होणाऱ्या निधीतील काही वाटा जिल्ह्याला विकास कामांसाठी परत दिला जातो. विशेषत: ज्या तालुक्यातून या खनिजाच्या रॉयल्टीपोटी रक्कम वसूल केली जाते, त्याच भागातील विकास कामांसाठी हा निधी प्राधान्याने खर्ची घालण्याच्या सूचना आहेत.
या निधीचा रस्ते, पाणी व प्रदूषणावर मात करणाऱ्या विकास कामांसाठी उपयोग केला जातो. यावर्षी प्रमुख खनिजांच्या माध्यमातून जिल्हा खनिज प्रतिष्ठान ट्रस्टमध्ये ३० कोटी, तर गौण खनिजाच्या उत्पादनातील १० कोटी, असे ४० कोटी रूपये जिल्हा प्रशासनाकडे जमा झाले आहे. या रकमेचा विनियोग करता यावा म्हणून जिल्हा प्रशासनाने राज्याकडे परवानगी मागितली. खर्चाची परवानगी मिळताच पालकमंत्र्याच्या नेतृत्वात बैठक घेऊन हा पैसा खर्ची घालण्याचे नियोजन केले जाणार आहे. (शहर वार्ताहर)