जिल्हा मुख्यालयाची तहसील शिकस्त इमारतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 12:59 AM2017-10-23T00:59:46+5:302017-10-23T00:59:58+5:30
जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये तहसील कार्यालयाच्या उत्तूंग व प्रशस्त इमारती असताना जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळचे तहसील कार्यालय मात्र शिकस्त इमारतीत सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये तहसील कार्यालयाच्या उत्तूंग व प्रशस्त इमारती असताना जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या यवतमाळचे तहसील कार्यालय मात्र शिकस्त इमारतीत सुरू आहे. येथे प्रशस्त कार्यालय उभारण्याचा प्रयत्न शिवसेनेने हाणून पाडल्यानंतर आता भाजपाने त्यादृष्टीने मोर्चेबांधणी चालविली आहे.
जिल्ह्यात १६ तहसील कार्यालये आहेत. यातील बहुतांश ठिकाणी या कार्यालयांची प्रशस्त इमारत आहे. काही ठिकाणी जुन्या इमारती पाडून, तर कुठे नवीन ठिकाणी इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु जिल्हा मुख्यालय असलेल्या यवतमाळच्या तहसील कार्यालयाची अवस्था येथील राजकीय व प्रशासकीय अपयश अधोरेखित करते. वास्तविक यवतमाळ तहसील कार्यालयाची इमारत सर्वात आधी उभी होणे अपेक्षित होते. मात्र राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्ती कमी पडली की काय, म्हणून आजही हे कार्यालय जुन्या ब्रिटीश कालीन मात्र शिकस्त इमारतीत चालविले जात आहे. या कार्यालयाचा परिसर विस्तीर्ण आहे. अनेक विभाग वेगवेगळ्या खोल्यांमध्ये विखुरले आहेत. कार्यालयाच्या परिसरात शिरल्यानंतर हे शासनाचे कार्यालय की बाजार, अशी अवस्था पाहायला मिळते. वाहने अस्ताव्यस्त लागलेली असतात. तेथे प्रतीक्षालय नाही. सेवानिवृत्त, वयोवृद्ध मंडळी कुठे तरी भिंतीच्या व सावलीच्या आश्रयाने बसलेले दिसतात. तहसीलदारांच्या कक्षापासून सेतू केंद्र दूर आहे. तेथे स्टॅम्प, तिकीट लागल्यास पुन्हा सेतूपासून या कार्यालयाकडे यावे लागते. जिल्हा मुख्यालयी सातत्याने केंद्र व राज्यातील प्रमुख मंत्र्यांची, सचिवांची वर्दळ राहात असताना यवतमाळचे तहसील कार्यालय नव्या प्रशासकीय इमारतीशिवाय एवढे वर्ष राहिलेच कसे, हा खरा चिंतनाचा विषय आहे.
जिल्ह्याचे पालकत्व शिवसेनेकडे असताना यवतमाळ तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारत बांधकामाचा विषय जिल्हा नियोजन समितीपुढे आला होता. मात्र त्यावेळी यवतमाळऐवजी सेनेने आपल्या बालेकिल्ल्यातील तहसील कार्यालयांना अधिक प्राधान्य दिले. शिवसेना-भाजपातील राजकीय वर्चस्वाचा वादही कदाचित त्यामागे असावा, अशी शक्यता अनेकजण बोलून दाखवितात. तहसील कार्यालयाची इमारत म्हणजे त्या मतदारसंघातील आमदाराच्या विकासाच्यादृष्टीचा आरसा असतो, याची उशिरा का होईना जाणीव झाल्याने आता भाजपाने यवतमाळ तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारत निर्माणाच्यादृष्टीने प्रयत्न चालविले असल्याची माहिती आहे. पूर्वी याच कार्यालयात एसडीओंचेही बस्तान होते. मात्र ते आता जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय इमारतीत हलविले गेले आहे. तहसील कार्यालय मात्र अद्यापही कौलारू इमारतीतच सुरू आहे. भाजपाच्या पालकत्वात या इमारतीचा कायापालट होण्याची अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.