जिल्हा मुख्यालय भरले, पंचायत समित्या रिकाम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 05:00 AM2020-08-09T05:00:00+5:302020-08-09T05:00:06+5:30
शिक्षण विभागातील पर्यवेक्षणाचे महत्त्वाचे काम करणाऱ्या गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी केंद्र प्रमुखांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली. विस्तार अधिकाऱ्यांची जिल्ह्यात ८८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५५ पदे आधीच रिक्त आहेत. यात अधिकाधिक विस्तार अधिकाऱ्यांना यवतमाळात आणून ठेवले. त्यापैकी ८ प्राथमिक शिक्षण विभागात, ५ माध्यमिक शिक्षण विभागात तर ५ विस्तार अधिकारी यवतमाळ पंचायत समितीमध्ये देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कारभार सुरळीत करण्यासाठी कोरोनासारख्या कठीण काळातही जिल्हा परिषदेनेबदली प्रक्रिया राबविली. मात्र यात अधिकारी कर्मचाऱ्यांना जिल्हा मुख्यालयात आणून उर्वरित १५ पंचायत समित्यांमध्ये खुर्च्या रिकाम्या सोडण्यात आल्या. प्रामुख्याने शिक्षण विभागात हा बदल्यांचा खेळखंडोबा पुढे आल्याने कोरोनानंतरचा शैक्षणिक कारभार अडखळण्याची शक्यता आहे.
शिक्षण विभागातील पर्यवेक्षणाचे महत्त्वाचे काम करणाऱ्या गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी केंद्र प्रमुखांच्या बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली. विस्तार अधिकाऱ्यांची जिल्ह्यात ८८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५५ पदे आधीच रिक्त आहेत. यात अधिकाधिक विस्तार अधिकाऱ्यांना यवतमाळात आणून ठेवले. त्यापैकी ८ प्राथमिक शिक्षण विभागात, ५ माध्यमिक शिक्षण विभागात तर ५ विस्तार अधिकारी यवतमाळ पंचायत समितीमध्ये देण्यात आले. त्यामुळे राळेगाव, महागाव, आर्णी, नेर, घाटंजी, पांढरकवडा, वणी या पंचायत समितीत एकही शिक्षण विस्तार अधिकारी उरलेला नाही.
गटशिक्षणाधिकाऱ्यांची अवस्था तर यापेक्षाही भयंकर आहे. नेर, झरी आणि दिग्रस वगळता सर्वत्र प्रभारावर काम सुरू होते. आता नेरचे गटशिक्षणाधिकारी राजीव ठाकरे यांची शिक्षणाधिकारी म्हणून बढती झाली. झरीचे हाडाळे अकोल्यात बदलीवर गेले. तर दिग्रसच्या शिकारे यांची याच महिन्याअखेरीस निवृत्ती आहे. त्यामुळे १६ पैकी एकाही पंचायत समितीत आता गटशिक्षणाधिकारी उरणार नाही. केंद्र प्रमुखांच्या जागा न भरल्याने हेही काम प्रभारावर निभावून नेले जात आहे. तर दुसरीकडे बदली प्रक्रियेतून एकट्या यवतमाळ पंचायत समितीमध्येच १३ केंद्र प्रमुख घेण्यात आले आहे. विस्तार अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने अनेक पंचायत समित्यांनी चक्क शालेय पोषण आहार अधीक्षकांना हा प्रभार दिला.
शिक्षकांच्या विनंती बदल्याही स्थगित
जिल्हा परिषद शिक्षकांचीही प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली होती. मात्र ग्रामविकासच्या निर्देशानुसार प्रशासकीय बदल्या थांबविण्यात आल्या. विनंती बदल्यांची प्रक्रियाही अंतिम क्षणी स्थगित करण्यात आली. त्याबाबत सीईओ डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी शनिवारी आदेश निर्गमित केला. कोरोना संसर्गाचा त्यासाठी हवाला देण्यात आला आहे.
बदलीस इच्छुक शिक्षकांचे आज आंदोलन
न्यायालय, विभागीय आयुक्तांचे आदेश असूनही जिल्हा परिषदेने पाच शिक्षकांची बदली टाळली, असा आरोप इब्टा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिवाकर राऊत यांनी केला. शिवाय यंदा विनंती बदल्यांसाठी शेकडो शिक्षक इच्छूक असताना बगल देण्यात आली. इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या कोरोना काळातच केलेल्या असताना शिक्षक बदल्यांनाच कोरोनाचा धोका कसा, हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. बदल्या करण्याच्या मागणीसाठी शिक्षक रविवारी आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.