जिल्हा आरोग्य विभागातील नोकरभरतीची जाहिरात बोगस, ‘डीएचओं’कडून शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 03:15 PM2021-05-17T15:15:18+5:302021-05-17T15:16:03+5:30
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता रिक्त पदांच्या सरळ सेवा पद्धतीने भरतीबाबत १६ मे २०२१ पासून सोशल मीडियावर एक जाहिरात प्रारुप प्रसिद्ध होत आहे.
यवतमाळ- सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत जिल्हा आरोग्य विभागात ४६ पदांच्या नोकरभरतीची जाहिरात समाज माध्यमांवर फिरताना दिसत आहे. परंतु ही जाहिरात बोगस असून सुशिक्षित बेरोजगार तथा उमेदवारांची दिशाभूल करणारी असल्याचे स्पष्ट करीत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी १७ मे रोजी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद नोंदविली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता रिक्त पदांच्या सरळ सेवा पद्धतीने भरतीबाबत १६ मे २०२१ पासून सोशल मीडियावर एक जाहिरात प्रारुप प्रसिद्ध होत आहे. ही जाहिरात जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्ध करण्यात आली नसून या कार्यालयाचा त्याच्याशी संबंध नाही, रिक्त पदे सरळसेवा भरतीने भरण्याचे कोणतेही नियोजन, प्रक्रिया या कार्यालयामार्फत सुरू नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
बेरोजगारांची दिशाभूल करणारी ही जाहिरात असून भविष्यात अनुचित प्रकारास वाव देणारी आहे. त्यामुळे अशा खोट्या जाहिराती प्रसिद्ध करून दिशाभूल करणाऱ्यांचा शोध घ्यावा, योग्य चौकशी करावी व कारवाई करावी, अशी मागणी डीएचओ डॉ. पवार यांनी पोलिसांकडे केली आहे.
या जाहिरातीमध्ये वैद्यकीय अधिकारी पद -१, महिलांमधून स्टाफ नर्स ६ जागा, आरोग्य सेवक २६, एएनएम सात, औषधी निर्माता ५ व लॅप टेक्नीशियन १ एवढी पदे नमूद करण्यात आली आहे. ही बोगस जाहिरात काढून सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक करणारे रॅकेट जिल्ह्यात सक्रीय असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या जाहिरातीमागे आरोग्य यंत्रणेतील कोणी सहभागी तर नसावे ना अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.