जिल्हा पोलीस दलात फेरबदल
By admin | Published: July 3, 2015 12:16 AM2015-07-03T00:16:30+5:302015-07-03T00:16:30+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी पोलीस दलात अनेक बदल केले आहेत.
यवतमाळ : जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी पोलीस दलात अनेक बदल केले आहेत. दहा निरीक्षक व सहा सहायक निरीक्षकांना नव्याने जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
यवतमाळ शहरचे ठाणेदार दिलीप चव्हाण यांच्यावर जिल्हा वाहतूक शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. जालना येथून पदोन्नतीवर बदलून आलेल्या मुकुंद कुळकर्णी यांना यवतमाळ शहरचे ठाणेदार बनविण्यात आले. त्याच प्रमाणे राळेगाव ठाणेदारपदी शिवशंकर ठाकूर, आर्णी संजय खंदाडे, यवतमाळ ग्रामीणमध्ये संजय डहाके, कळंब अरुण आगे तर मुकुटबन ठाणेदारपदी भरत गाडे यांची नियुक्ती करण्यात आली. पुसद येथील वाहतूक शाखेचे प्रमुख म्हणून हनुमंत गायकवाड तर वणी वाहतूक शाखेत बळवंत मांडगे यांना पाठविण्यात आले.
मोहन प्रजापती यांना स्थानिक गुन्हे शाखेअंतर्गत आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले. त्याच प्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांना वडगाव जंगलचे ठाणेदार बनविण्यात आले आहे. लाडखेड ठाणेदारपदी अनिल राऊत तर गजानन खाडे यांना पाटण ठाणेदार म्हणून नेमण्यात आले. एपीआय संतोष मोरे यांना आर्थिक गुन्हे शाखा, गजेंद्र क्षीरसागर यांना स्थानिक गुन्हे शाखेअंतर्गत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष प्रमुख तर किरण बकाले यांना पोलीस अधीक्षक कार्यालयातील अर्ज शाखेत नेमणूक देण्यात आली आहे. १ जुलै रोजी नियुक्त्यांचे हे आदेश जारी करण्यात आले.
जिल्ह्यातील वरकमाईचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही ठाण्यांसाठी पोलीस अधिकाऱ्यांनी राजकीय मार्गाने मोर्चेबांधणी केली होती. मात्र पोलीस प्रशासनाने राजकीय दबाव झुगारुन मेरिटनुसार बदल्या केल्याचे पोलीस वर्तुळातून सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)