प्रभारी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कार्यालयाच्या शोधात
By admin | Published: May 25, 2017 01:14 AM2017-05-25T01:14:48+5:302017-05-25T01:14:48+5:30
जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये नेतृत्व बदल होताच नव्या प्रभारी जिल्हाध्यक्षांनी पक्षासाठी दुसरे हक्काचे कार्यालय शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे.
हक्काचे कार्यालयच नाही : नऊ वर्षांपासून माजी आमदारांच्या बंगल्यात पक्षाचे बस्तान
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये नेतृत्व बदल होताच नव्या प्रभारी जिल्हाध्यक्षांनी पक्षासाठी दुसरे हक्काचे कार्यालय शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाविना याची पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या नऊ वर्षांपासून जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यालय माजी आमदार वामनराव कासावार यांच्या आर्णी रोड स्थित घरात थाटण्यात आले आहे. या कार्यालयातूनच काँग्रेसने लोकसभा, विधानसभा, विधान परिषद, नगरपरिषद, नगरपंचायती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढल्या आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून वामनराव कासावार हेच जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष असल्याने त्यांच्या घरात पक्षाचे जिल्हा कार्यालय अगदी बिनधास्त सुरू होते. परंतु काही दिवसांपूर्वीच जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष म्हणून पुसद येथील डॉ. वजाहत मिर्झा यांची नियुक्ती करण्यात आली. ही जबाबदारी सांभाळताच मिर्झा यांनी सर्वप्रथम पक्षाच्या सदस्य नोंदणीचे उद्दीष्ट डोळ्यापुढे ठेवले आहे. त्यासोबतच पक्षाला स्वत:चे व हक्काचे जिल्हा कार्यालय असावे, अशी भावना त्यांनी बोलून दाखविली. एवढेच नव्हे तर त्यासाठी प्रयत्नही सुरू केले. डॉ. वजाहत मिर्झा यांनी यवतमाळात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नव्या हक्काच्या कार्यालयासाठी शोध मोहीम सुरू केली आहे.
जिल्हाध्यक्ष बदलताच अचानक कार्यालयाची शोधाशोध सुरू झाल्याने ‘जुन्या अध्यक्षांनी आपला बंगला रिकामा तर करून मागितला नाही ना?’ याची चर्चा काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे. प्रभारी जिल्हाध्यक्षपद मिळताच वेगळे काही करून दाखविण्याची धडपड डॉ. वजाहत मिर्झा यांच्यामध्ये पहायला मिळते. त्यातूनच नव्या कार्यालयाचा शोध सुरू झाल्याचे सांगितले जाते.
पक्ष कार्यालयासाठी जागा घेतली
काँग्रेसमध्ये यवतमाळचा राज्याच्या राजकारणात दबदबा आहे. या जिल्ह्याने राज्याला दिर्घकाळ नेतृत्व दिले आहे. या जिल्ह्यातील नेत्यांनी वर्षानुवर्षे मंत्रीपदे भूषविली आहेत. त्यानंतरही पक्षाला जिल्हा मुख्यालयी स्वत:चे व हक्काचे अधिकृत कार्यालय असू नये यातच नेतृत्व करणाऱ्या या नेत्यांचे अपयश दडले आहे. मात्र काही महिन्यापूर्वीच काँग्रेसने पक्ष कार्यालयासाठी जागा खरेदी केली आहे. जिल्हा परिषद सभापतींच्या शासकीय निवासस्थानांच्या मागील बाजूला जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाची ही नियोजित जागा आहे. त्यावर कार्यालय उभे होण्याची प्रतीक्षा आहे.
आपण बंगला खाली करून मागितलेला नाही. नऊ वर्षांपासून आपल्या बंगल्यात हे कार्यालय सुरु आहे, ते पुढेही कायम राहू शकते. त्यात कोणतीही अडचण नाही.
- वामनराव कासावार
माजी आमदार, तथा माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यालय सध्या पूर्वीच्याच ठिकाणी आहे. मात्र पक्षाला हक्काचे कार्यालय असावे, म्हणून नव्या इमारतीचा शोध घेतला जात आहे.
- डॉ. वजाहत मिर्झा
प्रभारी अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी, यवतमाळ.