जिल्ह्यात वर्षभरात सहा हजार गंभीर गुन्ह्यांची नोंद

By Admin | Published: December 26, 2015 03:18 AM2015-12-26T03:18:29+5:302015-12-26T03:18:29+5:30

मावळत्या वर्षात जिल्ह्याभरामध्ये तब्बल सहा हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये शरीर दुखापतीचे सर्वाधिक गुन्हे आहेत.

The district recorded six thousand serious crimes in the year | जिल्ह्यात वर्षभरात सहा हजार गंभीर गुन्ह्यांची नोंद

जिल्ह्यात वर्षभरात सहा हजार गंभीर गुन्ह्यांची नोंद

googlenewsNext

शरीर दुखापतीचे सर्वाधिक गुन्हे : पोलीस पाटलाचा खून, यवतमाळातील तिहेरी हत्याकांडही गाजले
यवतमाळ : मावळत्या वर्षात जिल्ह्याभरामध्ये तब्बल सहा हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये शरीर दुखापतीचे सर्वाधिक गुन्हे आहेत. जिल्ह्यातील यावली इजारा येथील पोलीस पाटलाचा दारूविके्रत्यांनी केलेला खून आणि नवरात्र संपताच यवतमाळ शहरात घडलेले तिहेरी हत्याकांड सर्वसामान्यांचा थरकाप उडविणारे होते.
शरीर दुखापतीच्या गुन्ह्यांमध्ये विभागात आघाडीवर असलेले शहर म्हणून यवतमाळची नोंद आहे. येथे संघटीत गुन्हेगारी विशेष सक्रिय नसली तरी, सातत्याने खुनांच्या घटना घडतात. वर्षभरात ७० खून झाले आहेत. ६६ जणांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला आहे. बलात्काराच्या ९२ घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील यावली इजारा येथे दारूबंदीसाठी पुढाकार घेणारे पोलीस पाटील वीरेंद्र राठोड यांचा दारू विक्रेत्यांनी खून केला होता. या घटनेने संपूर्ण राज्यातच खळबळ निर्माण झाली. त्यानंतर जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात दारूबंदीची मागणी पुढे आली.
घाटंजी तालुक्यातील क्रुरकर्मा मामाला नात्यातील अल्पवयीन भाचीवर बलात्कार व खुनाच्या आरोपात शत्रुघ्न मेश्राम याला दुहेरी फाशीची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली. विशेष म्हणजे हाच निकाला उच्च न्यायालयानेही कायम ठेवला. त्यानंतर गणपती उत्सवाच्या काळात यवतमाळ शहरात एकाच दिवशी खुनाच्या दोन घटना घडल्या. पत्नीनेच सेवानिवृत्त मुख्याध्यापक असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून केला. तर कुख्यात असलेल्या सलिम इक्काचा त्याच्याच साथिदारांनी दगडाने ठेचून खून केला. यापूर्वी देवीनगरातील विद्यार्थिनीला भर रस्त्यात एकतर्फी प्रेमातून भोसकण्यात आले. तिचा रुग्णालयात दुर्दवी अंत झाला. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनांनी जिल्हा हादरला.
पोलीस यंत्रणेने गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये तत्परता दाखविली आहे. डिटेक्शनची टक्केवारीही ७७ टक्के इतकी आहे. झालेल्या पाच हजार ९७१ गुन्ह्यांपैकी चार हजार ६१४ गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांची संख्याही एक हजार १७३ ने घटली आहे. नोव्हेंबर २०१४ पर्यंत सात हजार १४४ गुन्ह्यांची नोंद झाली होती. असे असले तरी खुनाच्या गुन्ह्यांत मात्र वाढ झाली आहे. दुचाकी चोरींचे ३१ गुन्हे, नवविवाहितांच्या आत्महत्यात १३ ने वाढ, इतर आत्महत्या, निष्काळजीपणे वाहन चालविण्याचे प्रकार या वर्षात वाढले आहे. सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांवरच्या हल्ल्यात घट झाली असून, वर्षभऱ्यात केवळ ११४ प्रकरणे पोलिसांत दाखल आहेत. इतर गुन्ह्यातही घट झाली आहे. सरासरी २०१४ च्या तुलनेत २०१५मध्ये गुन्हेगारीत किंचीत का होईना घट झाल्याचे दिसून येते. मात्र पोलिसांनी खुनासारख्या घटना व जबरी चोरी थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. हे सरत्या वर्षातील आकडेवारीवरून दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: The district recorded six thousand serious crimes in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.