जिल्हा क्रीडा संकुलाचा कायापालट होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 09:52 PM2019-02-25T21:52:02+5:302019-02-25T21:52:15+5:30
जिल्हा क्रीडा संकुलाचा लवकरच कायापालट होणार आहे. तब्बल साडेआठ कोटी रुपयांची क्रीडा विकास कामे हाती घेतली जाणार आहे. यात प्रामुख्याने दोन मजली बहुद्देशीय हॉल, सिंथेटिक लॉन, टेनिस कोर्ट, जॉगिंग ट्रॅक, बॅडमिंटन व टेबल टेनिस हॉलचे अत्याधुनिक स्वरूपात नूतनिकरण आदी कामांचा समावेश राहणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी ‘लोकमत’ला दिली.
नीलेश भगत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा क्रीडा संकुलाचा लवकरच कायापालट होणार आहे. तब्बल साडेआठ कोटी रुपयांची क्रीडा विकास कामे हाती घेतली जाणार आहे. यात प्रामुख्याने दोन मजली बहुद्देशीय हॉल, सिंथेटिक लॉन, टेनिस कोर्ट, जॉगिंग ट्रॅक, बॅडमिंटन व टेबल टेनिस हॉलचे अत्याधुनिक स्वरूपात नूतनिकरण आदी कामांचा समावेश राहणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी ‘लोकमत’ला दिली.
जिल्ह्यातील सर्व खेळाडूंसाठी गोधणी रोडवरील नेहरू स्टेडियम येथे सध्या हक्काचे क्रीडा संकुल आहे. शहरात क्रीडांगणाची वानवा असल्याने जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडू, नागरिकांची गर्दी असते. सध्या येथे बॅडमिंटन हॉल, टेबलटेनिस हॉल, हॅन्डबॉल, फुटबॉल, बास्केटबॉल, क्रीडांगणे, स्केटींग, लॉन टेनिस कोर्ट, व्यायाम शाळा इत्यादी क्रीडा सुविधा आहेत. तसेच येथे साडेसहा कोटी रुपयांचे अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅकचे कामही सुरू आहे.
८० ते ९० खेळ व खेळाडूंची वाढती संख्या लक्षात घेता क्रीडा संकुलातील या क्रीडा सुविधाही अपूऱ्या पडत होत्या. आता साडेआठ कोटींच्या क्रीडा विकास कामाने खेळाडूंची ही गरज बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे.
जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलच्या बाजूला तीन कोटी ६५ लाख रुपयांचा दोन मजली बहुद्देशीय हॉल उभारला जाणार आहे. यात इनडोअर गेम, स्क्वॅश कोर्ट, चार बॅडमिंटन कोर्ट, जिम व विविध क्रीडांगणाचा समावेश राहील. सिंथेटिक ट्रॅकच्या मधल्या भागात फुटबॉल ग्राऊंड राहणार आहे. फुटबॉल पोलच्या मागे असणारी मोकळी जागा सिंथेटिक फ्लोरिंग करून तिथे खो-खो, कबड्डी, थ्रोविंग इव्हेंट आदी क्रीडांगणे तयार होणार आहे. सिंथेटिक ट्रॅकच्या भोवताल जॉगिंग ट्रॅक तयार होईल. जेणे करून पायदळ फिरणाºया नागरिक खेळाडूंची सोय होईल. यासर्व कामांवर तब्बल तीन कोटी ३१ लाख रुपये खर्च होणार आहे. सध्या नेहरू स्टेडियमवर असलेल्या लॉन टेनिस कोर्टवर सिंथेटिक कव्हर लावले जाणार आहे. हॅडबॉल ग्राऊंडच्या मागील भागापासून ते लॉन टेनिस कोर्टपर्यंत सिमेंट रस्ता, आजूबाजूला हायमास लाईट व प्रवेशद्वार उभारले जाणार आहे. आकाशवाणीच्या उजव्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेचा अधिकृतपणे ताबा घेऊन तिथे आर्चरी, हॉकी, शुटिंग, अॅथेलेटिक्समधील थ्रोविंग इव्हेंट व इतर क्रीडांगणे तयार केली जाणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.