खर्रा विक्रेत्यांविरूद्ध पोलिसांची जिल्हाभर मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2020 05:00 AM2020-05-01T05:00:00+5:302020-05-01T05:00:17+5:30
भोसा रोड, पवारपुरा, इंदिरानगर व अन्य भागात कोरोनाचा उद्रेक झाला. हापसीवरील गर्दी, पाण्याच्या प्रतीक्षेत झाडाखाली होणारी गर्दी ही प्रमुख कारणे त्यासाठी जबाबदार ठरली. मात्र यासोबत खर्रा हेसुद्धा एक कारण चर्चिले गेले. परंतु प्रत्यक्षात याबाबत कोणताही सबळ पुरावा अथवा आधार मिळालेला नाही. आतापर्यंतच्या रुग्णात केवळ एकाला याची बाधा झाल्याचे आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खर्रा खाणाऱ्यांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला याची चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात त्याबाबत कोणताच आधार नाही. आतापर्यंतच्या तपासणीत खर्ऱ्यामुळे संसर्ग झाल्याचा केवळ एक रुग्ण आढळून आला. मात्र या खर्ऱ्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावल्याने पोलिसांनी आता जिल्हाभर खर्रा विक्रेत्यांविरूद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. बुधवारी अनेक ठिकाणी कारवाईही करण्यात आली.
भोसा रोड, पवारपुरा, इंदिरानगर व अन्य भागात कोरोनाचा उद्रेक झाला. हापसीवरील गर्दी, पाण्याच्या प्रतीक्षेत झाडाखाली होणारी गर्दी ही प्रमुख कारणे त्यासाठी जबाबदार ठरली. मात्र यासोबत खर्रा हेसुद्धा एक कारण चर्चिले गेले. परंतु प्रत्यक्षात याबाबत कोणताही सबळ पुरावा अथवा आधार मिळालेला नाही. आतापर्यंतच्या रुग्णात केवळ एकाला याची बाधा झाल्याचे आढळून आले. तरीही खर्रा विक्रेते व खाणाऱ्यांमुळे पोलीस दलाकडे साशंकतेने पाहिले जात असल्याने पोलिसांनी या विक्रेत्यांविरूद्धच धडक कारवाई सुरू केली आहे. जिल्हाभर खर्रा विक्रेते व साठेबाजांविरूद्ध गुन्हे दाखल केले जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेची पथके खर्रा विक्रेत्यांवर वॉच ठेऊन आहे. ठिकठिकाणी माल जप्त केले जात आहे. बुधवारी जयभारत चौकातील विजय उर्फ टायसन रामदास सलाम (४४) हा घरून खर्रा विकत असल्याची गोपनीय माहिती सहायक फौजदार साहेबराव राठोड यांना मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून सलाम याच्या घरावर धाड टाकली. त्याच्या घरून खर्रा बनविण्यासाठी लागणारी सुपारी, तंबाखू व इतर साहित्याचा साठा जप्त केला. त्याच्याविरूद्ध भादंवि कलम २६९, २७०, सहकलम ५१ व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार गुन्हा दाखल केला.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर, सुधीर पिदुरकर, गजानंद हरणे, हरिश राऊत यांनी केली. चोरून खर्रा विकणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.
कळंबमध्ये ३५ हजारांचा खर्रा जप्त
कळंब : शहरातील काही भागात बनावट सुगंधी तंबाखू व सुपारी वापरून खर्रा विक्री सुरू होती. तपेश्वरी वॉर्डातील या अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी ३५ हजारांचा खर्रा जप्त केला. महंमद शकील महंमद खलील (५३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फोनवरूनच तो खºर्याची डिलिवरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कळंब शहरात बनावट सुगंधी तंबाखूची विक्रीही जोरात सुरू आहे. या तंबाखूमध्ये प्राणघातक घटकांचा वापर केला जातो. येथील मध्यवर्ती बँक रोडवरील टॉवरजवळच्या एका घरातून ही विक्री सुरू आहे. काही दिवसांपूर्वी येथे ४०७ मेटॅडोरने लाखो रुपयांचा माल उतरविण्यात आला. येथे आलेल्या सर्व मालाची पप्पूकडून विल्हेवाट लावण्यात आली. विशेष म्हणजे, येथून हाकेच्या अंतरावरच पोलीस ठाणे आहे तरीही या पप्पूला पोलिसांची भीती नाही. कारवाई केवळ किरकोळ विक्रेत्यांवर होते. मोठ्यांना परस्पर सूट मिळत असल्याचे दिसून येते.