जिल्ह्याचा रॉकेल कोटा २० लाख लिटरने घटला

By admin | Published: May 30, 2016 12:02 AM2016-05-30T00:02:26+5:302016-05-30T00:02:26+5:30

जिल्ह्याच्या रॉकेल नियतनात तब्बल दोन हजार केएल म्हणजे २० लाख लिटर रॉकेलची कपात झाली असून जिल्ह्यात वाढलेल्या दोन लाख सिलिंडर ग्राहकांमुळे ही कपात करण्यात आली.

The district's kerosene quota decreased by 20 lakh liters | जिल्ह्याचा रॉकेल कोटा २० लाख लिटरने घटला

जिल्ह्याचा रॉकेल कोटा २० लाख लिटरने घटला

Next

परिपत्रकाने फेरबदल : दोन लाख सिलिंडर वाढीने कपात
रूपेश उत्तरवार यवतमाळ
जिल्ह्याच्या रॉकेल नियतनात तब्बल दोन हजार केएल म्हणजे २० लाख लिटर रॉकेलची कपात झाली असून जिल्ह्यात वाढलेल्या दोन लाख सिलिंडर ग्राहकांमुळे ही कपात करण्यात आली. पूर्वी जिल्ह्याला ३२०० केएल रॉकेल मिळत होते. आता जिल्ह्याच्या वाट्याला ११२४ केएल म्हणजे ११ लाख २४ हजार लिटर रॉकेल मिळत आहे. यामुळे रॉकेलच्या काळ्याबाजाराला आळा बसण्यास मदत होणार आहे.
रात्रीच्या वेळी अंधाऱ्या झोपडीला प्रकाशमान करणारा दिवा काळाच्या पडद्याआड होण्याची चिन्ह आहेत. पूर्वी इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या रॉकेलचा वापर काळानुसार कमी झाला. मात्र यानंतरही रॉकेलची उचल कायम होती. दिवाबत्तीच्या नावावर येणारे रॉकेल चोरून खासगी वाहनासाठी विकले जात होते. राज्यातील रॉकेल घोटाळयातून हा प्रकार उघड झाला. यामुळे अनुदानावर उपलब्ध होणारे केरोसीन काळाबाजारातून बाहेर काढण्यासाठी राज्याने पाऊल उचलले आहे. एक अथवा दोन सिलिंडर असणाऱ्या ग्राहकाच्या कुटुंबाला केरोसीन न देण्याचा निर्णय घेतला. तसे परिपत्रकच निघाले. गत पाच वर्षात रॉकेल वापरात झालेली घट आणि शासनाच्या परिपत्रकानुसार केलेली कपात यातून जिल्ह्याचा कोटा दोन हजार केएलने घटला आहे.
गॅस सिलिंडरसारखे इंधनाचे पर्यायी साधन आल्यानंतरही रॉकेलची उचल विक्रेत्यांनी कमी केली नाही. हे रॉकेल काही विक्रेत्यांमार्फत मोठ्या प्रमाणात काळ्याबाजारात जात असल्याचा पुरवठा विभागाला संशय होता.
रॉकेल घोटाळयाने काळ्याबाजारावर शिक्कामोर्तब केले. यावर अंकुश बसविण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने सिलिंडर असणाऱ्या ग्राहकांचा रॉकेल कोटा थांबविण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार जिल्ह्यातील ग्राहकांची यादी पुरवठा विभागाने तयार केली. एक आणि दोन सिलिंडर असणाऱ्या ग्राहकाकडील रॉकेल बंद करण्यात आले. यातून दर महिन्याला रॉकेलमध्ये कपात नोंदविण्यात आली आहे. आता तर किरकोळ ग्राहकाकडे शिल्लक असणारे रॉकेल समर्पित करण्यात येत आहे. गत तीन महिन्यांत एक लाख ३२ हजार लिटर रॉकेल समर्पित करण्यात आले.
सिलिंडर नसलेल्या ग्राहकांसाठी सध्याच्या शासकीय निकषानुसार एका व्यक्तीला २ लिटर, दोन व्यक्तीला ३ लिटर, तीन व्यक्तीला चार लिटर रॉकेल देण्याचा नियम आहे. त्याकरिता प्रत्येक तालुक्यात रॉकेलचा दर निश्चित करण्यात आला आहे. प्रत्येक तालुक्यात वाहन खर्चानुसार वेगवेगळा दर निश्चित आहे. १६ रूपयांपासून १७ रूपयापर्यंतचा दर आहे.
२०१२ मध्ये जिल्ह्याला ३२०० केएल रॉकेलचा पुरवठा होत होता. तर जिल्ह्यात दोन लाख सिलिंडरची नोंद झाल्याने दोन हजार केएलने कमी झाला आहे. मे महिन्यात ११६४ केएल रॉकेल जिल्ह्यात नागरिकांसाठी वितरणाकरिता आले आहे. यामध्ये ४८ केएल रॉकेल शिल्लक असल्याने समर्पित करण्यात आले आहे.

रॉकेल वाटपासाठी ‘आधार’
गॅसपाठोपाठ रॉकेल ग्राहकांना पूर्ण किमतीत देण्याच्या हालचाली सुरू आहेत. यामध्ये केरोसीनचे अनुदान थेट ग्राहकाच्या खात्यात जमा होणार आहे. यामुळे केरोसीनचा गैरवापर टळणार आहे. याकरिता रॉकेलचे कार्ड आधार कार्डला जोडण्यात येत आहेत.

वाहनात जाणाऱ्या रॉकेलला बे्रक
जिल्ह्यातील रॉकेलचा साठा दोन हजार केएलने घटला आहे. पूर्वी हे रॉकेल मोठ्या प्रमाणात अवैध वाहनामध्ये वापरले जात होते. नवीन नियमामुळे रॉकेलमध्ये कपात झाली आहे. यामुळे अवैध वाहनात जाणाऱ्या रॉकेलला ब्रेक लागला आहे.

सिलिंडरअभावी आदिवासी बांधवांपुढे पेच
वन व्यवस्थापनासोेबत जलतनावर अंकुश लावण्यासाठी वन विभागाने आदिवासी बांधवांना गॅस सिलिंडर पुरविले आहेत. मात्र त्यांनी हे गॅस सिलिंडर परस्पर दुसऱ्यांना सुपूर्द केले. अशा स्थितीत शासनाच्या आदेशाने या कुटुंबाचे रॉकेल बंद करण्यात आले आहे. यामुळे या ग्राहकांपुढे जलतनासोबत दिवाबत्तीचा पेच निर्माण झाला आहे.


शासनाच्या नियमानुसार सिलिंडरधारक ग्राहकांचा रॉकेल कोटा बंद करण्यात आला. त्यामुळे रॉकेलमध्ये कपात झाली. सोबतच उरलेले रॉकेलही समर्पित करीत आहे. यामुळे अवैध रॉकेल विक्रीला आळा बसेल.
- शालिग्राम भराडी
जिल्हा पुरवठा अधिकारी, यवतमाळ

Web Title: The district's kerosene quota decreased by 20 lakh liters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.