पाटलांच्या विजयात जिल्ह्याचा वाटा मोठा
By admin | Published: February 7, 2017 01:20 AM2017-02-07T01:20:38+5:302017-02-07T01:20:38+5:30
पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉ. रणजित पाटील यांच्या विजयात जिल्ह्याचा वाटा मोठा असल्याचा दावा भाजपाच्या गोटातून केला जात आहे.
पदवीधरांनी खोडके-धोटेंना नाकारले : भाजपाची वाढली ताकद
यवतमाळ : पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉ. रणजित पाटील यांच्या विजयात जिल्ह्याचा वाटा मोठा असल्याचा दावा भाजपाच्या गोटातून केला जात आहे.
डॉ. रणजित पाटील यांना आपल्या बालेकिल्ल्यात बराच राजकीय विरोध होता, असे सांगितले जाते. काँग्रेसचे संजय खोडके अमरावतीकर असल्याने त्यांना पदवीधरांची अधिक पसंती राहील याचा अंदाज डॉ. पाटील यांना होता. म्हणून त्यांनी सुरुवातीपासूनच यवतमाळ जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले होते. यवतमाळात भाजपाचे पाच आमदार आहेत. त्यांच्या संपर्काचासुद्धा रणजित पाटील यांनी फायदा करून घेतला. जिल्ह््यात ३२ हजारांवर पदवीधरांची नोंदणी झाली. त्यापैकी सुमारे २२ हजार पदवीधरांनी मतदानाचा हक्क बजावला. या पैकी १८ ते २० हजार मतदान डॉ. पाटलांना मिळेल, असा दावा निकालापूर्वीच भाजपाकडून केला जात होता. त्यांना मिळालेले ३४ हजारांचे मताधिक्य पाहता हा दावा खराही ठरला. कालपर्यंत काँग्रेसचे पाच आमदार राहिलेल्या यवतमाळ जिल्ह्याची संजय खोडकेंना फारशी साथ लाभली नाही. रणजित पाटलांनी त्यांना पराभूत केले. अशीच स्थिती अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार समर्थित अपक्ष उमेदवार प्रा. दीपक धोटे यांची झाली. प्रा. धोटे यांच्यासाठी बच्चू कडू यांनी वणीपासून उमरखेडपर्यंतचा परिसर पालथा घातला. मात्र पदवीधर मतदारांनी कडू व त्यांच्या उमेदवाराला पसंती दिली नाही. रणजित पाटील यांच्या विजयाने जिल्ह्यात भाजपाची ताकद आणखी वाढल्याचे मानले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)
गृहराज्यमंत्री रणजित पाटील सुमारे दीड वर्षांपासून पदवीधर मतदारसंघाच्या तयारीला लागले होते. पोलीस ठाण्यांऐवजी शाळा-महाविद्यालयांना भेटी देऊन तेथील शिक्षकांशी संपर्क प्रस्थापित करण्याकडे डॉ. पाटील यांचा अधिक कल होता. अनेक तालुक्यांना त्यांनी प्रचारासाठी दोन ते तीनदा भेटी दिल्या. दौऱ्याचे निमित्त कोणतेही असो, डॉ. पाटील मात्र आपला पदवीधरचा प्रचार कायम ठेवत होते.