कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जिल्हाभर जमावबंदीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 05:00 AM2021-02-19T05:00:00+5:302021-02-19T05:00:02+5:30

नव्या आदेशानुसार, जिल्ह्यातील बाजारपेठेची वेळ रात्री ८ पर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. तर हाॅटेल, रेस्टाॅरेन्टला सकाळी ८ ते रात्री ९.३० अशी वेळ निर्धारित करून देण्यात आली आहे. विविध सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमांना निर्बंध असून लग्नासाठी ५० तर अंत्यसंस्कारासाठी २० व्यक्तींची मर्यादा घालण्यात आली आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Districtwide curfew orders for corona infection control | कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जिल्हाभर जमावबंदीचे आदेश

कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जिल्हाभर जमावबंदीचे आदेश

Next
ठळक मुद्देकडक निर्बंध लागू : बाजारपेठांना रात्री ८ वाजेपर्यंतची मर्यादा, हाॅटेल ९.३० पर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हाभर जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळपासून या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी या संबंधीचे आदेश जारी केले आहेत. 
या नव्या आदेशानुसार, जिल्ह्यातील बाजारपेठेची वेळ रात्री ८ पर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. तर हाॅटेल, रेस्टाॅरेन्टला सकाळी ८ ते रात्री ९.३० अशी वेळ निर्धारित करून देण्यात आली आहे. विविध सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमांना निर्बंध असून लग्नासाठी ५० तर अंत्यसंस्कारासाठी २० व्यक्तींची मर्यादा घालण्यात आली आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. ८ वाजतानंतर दुकान सुरू दिसल्यास त्याला जागीच दंड ठोठावला जाणार आहे.  
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व त्यातील मृतांची संख्या वाढते आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निर्बंधांवर शासन स्तरावरून जोर दिला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर जिल्हाभर    जमावबंदी व त्या अनुषंगाने विविध निर्बंधाबाबत आदेश जारी करण्यात आले. कोरोनाचा उद्रेक असलेल्या यवतमाळ, पुसद, पांढरकवडा या पालिका क्षेत्रातून दरदिवशी प्रत्येकी ५०० नमुने घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तहसीलदारांच्या नेतृत्वात पथके गठित करण्यात आली असून, ही पथके निर्बंधांच्या काटेकोर अंमलबजावणीवर नजर ठेवणार आहेत. शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, यात्रा, धार्मिक कार्यक्रम यावर ब्रेक लावण्यात आला आहे. लग्नसमारंभात ५० पेक्षा अधिक व्यक्ती दिसल्यास मंगल कार्यालयांवर कारवाई केली जाईल. त्यासाठी मंगल कार्यालयांवर छुप्या धाडी व तपासणीची व्यूहरचना करण्यात आली आहे. हॉटेल, ढाबे, बार, रेस्टॉरन्ट येथेही मंजूर क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीची मर्यादा निश्चित केली. 
टिकैत यांच्या महापंचायतीला  परवानगी नाकारली
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाचे प्रमुख नेते राकेश टिकैत यांची शनिवारी २० फेब्रुवारी रोजी यवतमाळातील आझाद मैदानात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता टिकैत यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. दरम्यान, ही सभा होणारच असा दावा संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य संदीप गिड्डे यांनी केला आहे. 

एक जण पाॅझिटिव्ह निघाल्यास २० जणांना तपासणार 
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर राहणार आहे. आता एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्या संपर्कातील २० जणांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. पूर्वीप्रमाणेच पॉझिटिव्ह रुग्णाचा रहिवासी परिसर चहूबाजूने सील केला जाणार आहे. 
मास्क न लावणाऱ्यास दंड, न जुमानल्यास कारागृह 
विनामास्क आढळलेल्या व्यक्तीला पहिल्यांदा ५०० रुपये, दुसऱ्यांदा ७५० रुपये, तिसऱ्यांदा हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे. चौथ्यांदा सदर व्यक्ती विनामास्क आढळल्यास त्याची थेट कारागृहात रवानगी केली जाईल. या प्रकरणात महसूल व पोलीस अधिकाऱ्यांसोबतच ग्रामसेवकालाही कारवाईचे अधिकार देण्यात आले आहे. 
शहरी शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस २८ फेब्रुवारीपर्यंत बंद 

 जिल्ह्यातील पाचवी ते नववीपर्यंत सुरू असलेल्या नगर परिषद, नगर पंचायत क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारच्या खासगी शैक्षणिक संस्था, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस २८ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहे. या काळात ऑनलाईन शिक्षणासाठी परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, दहावी - बारावीच्या वर्गांबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात उल्लेख करण्यात आलेला नाही. ग्रामीण शाळा सुरू राहतील. 

‘नो मास्क नो एन्ट्री’
 खासगी आस्थापनांमध्ये मास्क, फेस कव्हर घालून असलेल्या व्यक्तींनाच दुकानांमध्ये प्रवेश देण्याच्या सूचना आहेत. हॉटेलमध्येसुद्धा याच नियमाचे पालन करावे लागणार आहे. याकरिता दर्शनी भागात तसे फलक लावावे लागणार आहे. 

नवी नियमावली जारी
 सर्व दुकाने, बाजारपेठ रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. 
 दुकानदार, फळे भाजीपाला विक्रेते, सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेते आणि ग्राहक यांनी सामाजिक अंतर न राखल्यास २०० ते दोन हजारांचा दंड आकारण्यात येणार आहे. 
 किराणा, जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांचे दरपत्रक न लावल्यास दोन हजार रुपयांचा दंड, 
 सामाजिक अंतराचे पालन करून रात्री १० पर्यंत लग्नसमारंभास परवानगी देण्यात आली आहे. त्याकरिता तहसीलदार, मुख्याधिकारी, पोलीस विभाग यांना माहिती देणे बंधनकारक आहे. 
हॉटेल, पानटपरी, चहाची टपरी, चौपाटी इत्यादी ठिकाणी मास्कचा, हॅन्ड सॅनिटायझरचा आणि सोशल डिस्टन्सचे पालन करावे लागणार आहे.  
 धार्मिक स्थळे, धार्मिक संस्था, मस्जीद, मंदिर, चर्च व इतर ठिकाणी धार्मिक कार्यक्रमामध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. 
रेस्टॉरन्ट, हॉटेल्स सकाळी ८ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तर होमडिलिव्हरीकरिता ११.३० वाजेपर्यंत मुभा राहणार आहे. 
 जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. 
 

 

Web Title: Districtwide curfew orders for corona infection control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.