खळबळजनक घटना; जेलरची रिव्हॉल्वर चोरून सुनेने केला सासूचा गेम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2022 09:56 PM2022-01-24T21:56:41+5:302022-01-24T21:57:06+5:30
Yawatmal News तरुण सुनेने शेजारी राहणाऱ्या निवृत्त जेलरची सर्व्हिस रिव्हॉल्वर चोरून त्यातून सासूवर गोळी झाडली.
यवतमाळ : सासू-सुनेचे विकोपाला जाणारे वाद आता नवे राहिलेले नाहीत. मात्र अशाच वादातून तरुण सुनेने शेजारी राहणाऱ्या निवृत्त जेलरची सर्व्हिस रिव्हॉल्वर चोरून त्यातून सासूवर गोळी झाडली. त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वृद्ध सासूचा जागीच मृत्यू झाला. येथील प्रभाग क्र. २ मध्ये सोमवारी सकाळी घडलेल्या या खळबळजनक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.
आशा किसनराव पोरजवार (६८) असे या घटनेतील मृत सासूचे नाव आहे. तर त्यांच्यावर बंदुकीतून गोळी झाडणाऱ्या सरोज अरविंद पोरजवार (२८) या सुनेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोरजवार कुटुंबीय अतिशय गरिबीच्या अवस्थेत प्रभाग क्र. २ मध्ये राहते. स्वत: आशा व त्यांचा मुलगा अरविंद हे भाजीविक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर त्यांचा दुसरा मुलगा मंगेश हा एका प्रतिष्ठानात नोकर म्हणून काम करतो. परंतु सासू आशा आणि सून सरोज यांच्यात नेहमीच घरगुती कारणावरून कुरबुरी होत होत्या. त्यातूनच तरुण सुनेने वृद्ध सासूचा कायमचा गेम करण्याचा निर्णय घेतला.
पोरजवार यांच्या घरापुढेच निवृत्त जेलर प्रभू गव्हाणकर राहतात. त्यांच्या घरातून २१ जानेवारी रोजी सरोजने गव्हाणकर यांची सर्व्हिस रिव्हॉल्वर चोरली. या चोरीची आर्णी पोलिसात तक्रारही करण्यात आली. मात्र हे रिव्हॉल्वर कुणालाच सापडले नव्हते. तर दुसरीकडे सरोजने सासूचा गेम करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत तब्बल चार दिवस रिव्हॉल्वर घरातच लपवून ठेवले.
सोमवारी सकाळी घरात दोघीच असल्याची संधी साधून सरोजने आशा पोरजवार यांच्यावर पाठीमागून गोळी झाडली. त्यानंतर पुन्हा रिव्हॉल्वर लपवून ठेवली. मात्र सासू घरातच पाय घसरून पडल्यामुळे प्रचंड जखमी झाल्याचा बनाव निर्माण केला. मात्र काही वेळातच सासूचा मृत्यू झाला. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्यावर गोळी लागल्यामुळेच मृत्यू झाल्याचे पुढे आले. मात्र ही गोळी नेमकी कुणी झाडली, ही बंदूक शेजारच्या निवृत्त जेलरचीच आहे का याचा उलगडा झाला नाही. दरम्यान, तातडीने आशा यांचा मृतदेह यवतमाळ येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदनातूनही गोळी लागल्यामुळेच मृत्यू झाल्याचे पुढे आले. त्यानंतर तातडीने पोलिसांनी सरोज अरविंद पोरजवार हिला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. पोलिसी हिसका दाखविताच तिने खुनाची कबुली दिली.