आश्विनच्या मूक संवेदनेला सुरेखाची साथ; घाटकिन्हीच्या या अनोख्या विवाहाची पंचक्रोशीत चर्चा
By रवींद्र चांदेकर | Published: September 4, 2023 05:51 PM2023-09-04T17:51:26+5:302023-09-04T17:57:44+5:30
अनोखा विवाहसोहळा, त्यांच्या जीवनाचा मार्ग सुकर झाला
दारव्हा (यवतमाळ) : बालपणीच आई-वडिलांचे छत्र हरविलेले. त्यातच तो दिव्यांग. मात्र, आता त्याच्या ‘मूक’ संवेदनेला तिची साथ लाभली. तिने त्याच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांच्या विवाहाची अवघ्या पंचक्रोशीत चर्चा होत आहे.
तालुक्यातील घाटकिन्ही (हनुमाननगर) येथील आश्विन राठोड जन्मताच दिव्यांग आहे. त्याला बोलता येत नाही. शारीरिक व्यंगत्वाचे संकट कमी म्हणून की काय नियतीने त्याच्यावर बालपणीच मोठा आघात केला. तो अवघ्या दोन महिन्यांचा असताना आई मरण पावली. त्यामुळे वडील दारासिंग राठोड यांनी दुसरा विवाह केला. सावत्र आई पार्वतीने त्याचा मायेने सांभाळ केला. परंतु, दोन वर्षांनंतरच वडील दारासिंग यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. नंतर मोठे वडील शेषराव राठोड यांनी त्याला साथ दिली.
अमरावती येथील दिव्यांगांच्या शाळेत त्याने शिक्षण घेतले. त्या ठिकाणी इशाऱ्याने संवाद साधण्याची कला आश्विनने अवगत केली. परंतु, घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला आठवीपर्यंतच शिक्षण घेता आले. त्यानंतर गावी परतून त्याने मोलमजुरी करीत कुटुंबाला हातभार लावला. मोठा झाल्यानंतर त्याच्या लग्नासाठी स्थळ शोधणे सुरू झाले. मात्र, शारीरिक दिव्यांग असल्याने मोठी अडचण जात होती. अशातच दिग्रस तालुक्यातील साखरा येथील नातेवाईकांच्या माध्यमातून मोखचे स्थळ आले. आश्विनप्रमाणेच दिव्यांग असलेल्या सुरेखाशी विवाह ठरला आणि ३ सप्टेंबरला विवाहसुद्धा पार पडला. या विवाहाची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे.
सुरेखाच्या एन्ट्रीने जीवनप्रवास सुखकर
आता आश्विनच्या मूक संवेदनेला सुरेखाची साथ मिळाली आहे. त्यामुळे त्याच्या जीवनाचा मार्ग सुकर झाला आहे. घाटकिन्ही येथे दिव्यांगांचा विवाह धूमधडाक्यात पार पडला. मोठ्या उत्साहाने गावकरी त्यात सहभागी झाले. बालपणापासून अनेक संकटे झेलणाऱ्या आश्विनच्या आयुष्यात आता सुरेखाची एन्ट्री झाल्याने त्याचा जीवनप्रवास सुखकर झाला आहे.