विषप्रयोग करून पत्नीने केला दिव्यांग पतीचा खून; एक महिन्यानंतर गुन्हा उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 08:26 PM2020-05-25T20:26:05+5:302020-05-25T20:26:29+5:30
यवतमाळ जिल्ह्यात एका दिव्यांग व्यक्तीला त्याच्याच पत्नीने विष पाजून त्याचा खून केल्याची घटना पोलिस तपासात उघड झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : एका दिव्यांग व्यक्तीला त्याच्याच पत्नीने विष पाजून त्याचा खून केल्याची घटना पोलिस तपासात उघड झाली.
एप्रिल महिन्यात एका दिव्यांग व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला होता. शवविच्छेदन अहवालानुसार विष प्राशनाने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हे प्रकरण अवधुतवाडी पोलिसांनी निकाली काढले. गोपनीय माहितीवरून टोळी विरोधी पथकातील कर्मचाऱ्याला हा अकस्मात मृत्यू नसून खून असल्याचा सुगावा लागला. नंतर तपासात पत्नीनेच दिव्यांग पतीला विष पाजून मारल्याची धक्कादायक बाब पुढे आली.
रामदास ईश्वर दहीकर (४७) रा.जामनकरनगर असे मृताचे नाव आहे. २१ एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी २२ एप्रिलला अवधुतवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद घेतली. त्यानंतर याबाबत कुठलाही तपास अवधुतवाडी पोलिसांनी केला नाही. टोळी विरोधी पथकातील योगेश गटलेवार यांना तब्बल महिनाभराने किराणा व्यावसायिकाकडून घटनेबाबत सुगावा मिळाला. अपंग रामदास दहीकर याचा मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी मृताच्या पत्नीने रात्री ९.३० वाजता कोल्ड ड्रिंक्स नेल्याची माहिती मिळाली. संशय बळावल्याने टोळी विरोधी पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या घटनेबाबतचा अहवाल अवधुतवाडी पोलिसांकडून ताब्यात घेतला. संशयावरून त्या महिलेला स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण, मिलन कोयल यांनी ताब्यात घेतले. सुरुवातीला त्या महिलेने घटनेबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखविताच तिने संपूर्ण हकिगत सांगितली. गुन्हा कबुल केल्यानंतर त्या महिलेला अवधुतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. वृत्त लिहिपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
असा केला गुन्हा
लॉकडाऊनपासून घरात आर्थिक विवंचना होती. पती दिव्यांग असल्याने कोणताच कामधंदा करत नव्हता. शिवाय भाड्याचे घर असल्याने महिन्याला भाडे द्यावे लागत होते. या सर्व जाचाला कंटाळून पतीला कोल्डड्रिंकमधून विष दिले. दत्त चौकातील कृषी केंद्रातून विषाची बॉटल खरेदी केल्याची कबुली त्या महिलेने दिली. सुरुवातीला तिने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी पतीच्याच नात्यातील एका व्यक्तीने खून केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या व्यक्तीलाही ताब्यात घेतले. मात्र चौकशीत काहीच निष्पन्न झाले नाही. शिवाय महिलेने सांगितलेल्या घटनाक्रमात ती व्यक्ती दूरदूरपर्यंत सहभागी असल्याचे आढळले नाही. त्यामुळे त्या व्यक्तीची सुटका करण्यात आली.
मुले पोरकी
या दहीकर दाम्पत्याला दोन मुले आहेत. आईनेच वडिलाचा खून केल्याने ही दोनही मुले आता पोरकी झाली आहेत. त्यांच्यावरील छत्र हरविल्याने आता त्यांना आधार कोण देणार, अशी स्थिती आहे.