दिव्यांगांचा तीन दिवसांपासून ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 09:36 PM2019-07-17T21:36:25+5:302019-07-17T21:36:38+5:30
येथील नगरपरिषदेसमोर विविध मागण्यांसाठी दिव्यांग सामाजिक संघटनेने तीन दिवसांपासून ठिय्या दिला आहे. आंदोलनाला तीन दिवस उलटूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : येथील नगरपरिषदेसमोर विविध मागण्यांसाठी दिव्यांग सामाजिक संघटनेने तीन दिवसांपासून ठिय्या दिला आहे. आंदोलनाला तीन दिवस उलटूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
दिव्यांग सामाजिक संघटनेने १५ जुलैपासून नगरपरिषदेसमोर विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले. २०१८-१९ मध्ये नगरपरिषदेकडे दिव्यांग बांधवांसाठी पाच टक्के निधी प्राप्त झाला. या निधीचा दिव्यांगांना तत्काळ लाभ देण्याची मागणी संघटनेने केली आहे. जन्म - मृत्यू नोंदणीनुसार दिव्यांग बांधवांची आॅनलाईन रजिस्टर नोंदणी करणे, दिव्यांगांना विनाअट घरकूल योजनेचा लाभ द्यावा आदी मागण्याही संघटनेने केल्या आहे.
संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनाचे नेतृत्व संस्थापक अध्यक्ष मारोती सुरोसे, संचालक सचिव सैयद मोशिरोद्दीन, उपाध्यक्ष शारदा चव्हाण करीत आहे. आंदोलनात तालुक्यातील दिव्यांग, अंध, मूकबधिर, कर्ण बधिर बांधव सहभागी झाले आहे. मात्र आंदोलनाला तीन दिवस उलटून गेल्यानंतरही प्रशासन दखल घेत नसल्याने आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. बुधवारी तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू होते. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका संघटनेने घेतली आहे. विविध संघटनांनीही दिव्यांग बांधवांच्या मागण्या तातडीने पूर्ण व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.