दिवाळीची सुटी, एसटीची बुट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:24 PM2017-10-17T23:24:40+5:302017-10-17T23:24:51+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी ऐन दिवाळीच्या सुटीत सोमवारी मध्यरात्रीपासून बंद पुकारल्याने जिल्ह्यात एसटीची चाके थांबली. यामुळे सुमारे सव्वा लाख प्रवाशांची तारांबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी ऐन दिवाळीच्या सुटीत सोमवारी मध्यरात्रीपासून बंद पुकारल्याने जिल्ह्यात एसटीची चाके थांबली. यामुळे सुमारे सव्वा लाख प्रवाशांची तारांबळ उडाली. त्यांना खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार घेत प्रवास करावा लागला.
महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात राज्यभरात एसटी महामंडळाच्या कर्मचाºयांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला. या संपामुळे जिल्ह्यातील नऊ आगारातील ४९० बसेसची चाके मंगळवारी थांबली. परिणामी जवळपास दीड लाख किलोमीटरचा प्रवास रद्द झाला. दिवाळीनिमित्त गावी जाणारे सव्वा लाख प्रवासी विविध बसस्थानकांत अडकून पडले. त्यांना खासगी वाहतुकीचा आधार घेत प्रवास करावा लागला. अनेकांना संपाची कल्पना नसल्याने त्यांचे हाल झाले.
संपामुळे जिल्ह्यात महामंडळाचे जवळपास ३७ लाख रूपयांचे उत्पन्न बुडाले. जिल्ह्यात ७५० बसफेºया रद्द झाल्या. त्याचा फटका हजारो प्रवाशांना सहन करावा लागला. जागोजागी प्रवासी अडकून पडले. त्यांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागला. बालके आणि वृद्धांना या वाहनांमध्ये अक्षरश: जनावरांप्रमाणे कोंबण्यात आले. त्यांना वाहनात कोंबून खासगी प्रवासी वाहतुकदारांनी मंगळवारी लाखोंची माया गोळा केली. मात्र बालके आणि वृद्धांना प्रचंड यातना सहन कराव्या लागल्या.
या संपाचे नेतृत्व महाराष्ट्र मोटर्स कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय जिरापुरे, विभागीय सचिव स्वप्नील तगडपल्लेवार, एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष राहुल धार्मिक, एसटी कामगार संघटनेचे विभागीय सचिव सदाशिव शिवणकर, इंटकचे अध्यक्ष सतीश डाखोरे, इंटकचे विभागीय सचिव पंजाब ताटेवार, संघर्ष ग्रुपचे सचिन गिरी, भास्कर भानारकर, रतन पवार, डी.के.भगत, विलास झेंडे आदींनी केले.
शासन स्तरावर एसटी कामगारांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी अनेकदा कर्मचारी संघटनांनी आंदोलने केली. नंतर एसटी प्रशासनाला संपाचा इशाराही देण्यात आला होता. तरीही प्रशासन व शासनाने कामगारांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अखेर संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात एसटी कामगारांनी सोमवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला. यवतमाळ विभागातील सर्व आगारातील जवळपास अडीच हजारांच्यावर कर्मचारी या संपात उतरले आहे.
‘खासगी’ची मात्र दिवाळी
संपामुळे प्रवाशांनी खासगी वाहनांचा आधार घेतला. या वाहतुकदारांनी संधीचे सोने करीत दरवाढ करून प्रवाशांना वेठीस धरले. संपाचा लाभ घेत जादा पैसा कमविण्याच्या हेतूने त्यांनी प्रवाशांची कोंडी करून आपली दिवाळी खºया अर्थाने साजरी केली. मात्र खासगी वाहतूक व्यवस्थाही अपुरी पडल्याने अनेक प्रवाशांनी मंगळवारी प्रवास रद्द केला.
ट्रॅव्हल्स चालकांकडून पुणेरी प्रवाशांची लूट
संपाचा लाभ घेत टॅव्हल्स चालकांनीही प्रवाशांची लूट केली. एसटी महामंडळाचे तिकीटाचे दर सामान्य प्रवाशाच्या आवाक्यात असतात. त्या तुलनेत टॅव्हल्सचे दर जादा असतात. संपाचा लाभ घेत टॅव्हल्स चालकांनी हे दर तिप्पट केले. दुसरीकडे परिवहन महामंडळाने बुकींग झालेल्या प्रवाशांना पैसे परत केले. अशा प्रवाशांना टॅव्हल्सचा आसरा घ्यावा लागला. विशेषत: पुण्याहून येणाºया प्रवाशांना या तिप्पट दराचा मोठा फटका बसला.