उमरीपठारच्या निराधार मायबापांची संवेदनशील गोतावळ्यात दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2018 09:36 PM2018-11-08T21:36:53+5:302018-11-08T21:38:44+5:30

ज्यांना कुटुंबच नाही, त्यांचे कुटुंब बनले उमरी पठारचे वृद्धाश्रम. या निराधार मायबापांचा मुलगा होऊन शेषराव डोंगरे २७ वर्षांपासून निरंतर सेवा करीत आहेत. ज्येष्ठांच्या सेवाशुश्रृषेसाठी माजी खासदार विजय दर्डा यांच्या निधीतून सुसज्ज सेवाधाम बांधण्यात आले.

Diwali in the vulnerable atmosphere of the middle class | उमरीपठारच्या निराधार मायबापांची संवेदनशील गोतावळ्यात दिवाळी

उमरीपठारच्या निराधार मायबापांची संवेदनशील गोतावळ्यात दिवाळी

Next
ठळक मुद्देवृद्ध सद्गदीत : माजी खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते सेवाधामचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : ज्यांना कुटुंबच नाही, त्यांचे कुटुंब बनले उमरी पठारचे वृद्धाश्रम. या निराधार मायबापांचा मुलगा होऊन शेषराव डोंगरे २७ वर्षांपासून निरंतर सेवा करीत आहेत. ज्येष्ठांच्या सेवाशुश्रृषेसाठी माजी खासदार विजय दर्डा यांच्या निधीतून सुसज्ज सेवाधाम बांधण्यात आले. त्याच्या लोकार्पणाचे निमित्त साधून गुरुवारी माजी खासदार, माजी मंत्री, विद्यमान आमदार यांच्यासह शेकडो नागरिकांनी वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत दिवाळी साजरी केली.
तालुक्यातील उमरी पठार या आडवळणाच्या गावात संत श्री दोला महाराज वृद्धाश्रमाने सेवेची २७ वर्षे पूर्ण केली आहेत. लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांच्या खासदार निधीतील १० लाखातून येथे सेवाधाम बांधण्यात आले. या इमारतीचे लोकार्पण गुरुवारी विजय दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या सेवेसाठी आलेली शेकडो मुले पाहून येथील ८७ वृद्धांचे चेहरे आनंदाने खुलून गेले होते. विशेष म्हणजे, विजय दर्डा यांनी थेट या वृद्धांच्या गर्दीत बसून हितगुज केले. त्यांची सुख-दु:खे जाणून घेतली. आर्थिक दिलासा देतानाच त्यांना मानसिक आधारही दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी द. तु. नंदापुरे गुरुजी होते. तर प्रमुख अतिथी स्वामी योगचित्तम सरस्वती, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, आमदार ख्वाजा बेग, आमदार राजू तोडसाम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगूळकर, लोकमत जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, संस्थेचे अध्यक्ष सुरेश राठी, कांतीलाल कोठारी, प्रेमासाई महाराज, संस्थापक सचिव शेषराव डोंगरे आदी उपस्थित होते.
विजय दर्डा म्हणाले, मी आज खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली. आनंद गावंडेंनी माझी डोंगरेंशी भेट घडवून आणली. त्यातून या चांगल्या कामासाठी मला हातभार लावता आला. इथे येऊन मी स्वत:ला धन्य मानतो. कारण माझे आईवडिलांवर नितांत प्रेम आहे. मोठ्यांची सेवा हाच मी धर्म मानतो. देऊळ बांधण्यापेक्षा वृद्धाश्रम महत्त्वाचे आहेत. समाजात देणाऱ्यांची कमी नाही, फक्त विश्वासाची कमी आहे. शेषराव डोंगरेंनी २७ वर्षांपूर्वी वृद्धाश्रमाचे काम सुरू केले. आईवडिल समजून ते वृद्धांची सेवा करीत आहेत. यापेक्षा दुसरे पुण्याचे काम नाही.
तरुणांना आवाहन, आमदारांना सूचना अन् ज्येष्ठांचे आशीर्वाद
कार्यक्रमाचे उद्घाटक विजय दर्डा म्हणाले, समाजात वृद्धांविषयीचा आदर कमी होत चालला आहे. तरुणांना म्हातारी माणसे ओझे वाटू लागली आहेत. त्यामुळे सध्या विकास आणि विनाश एकाच वेळी होत आहे. मात्र तुम्ही जे कराल, तेच भराल. म्हणून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होणे महत्त्वाचे आहे. या परिसरातील सर्व तरुणांनी नेहमी उमरी पठारच्या वृद्धाश्रमात यावे. येथील वृद्धांसोबत बोलावे. त्यांना मानसिक आधार द्यावा. तर या भागातील आमदारांनी वृद्धांसाठी विविध योजनांतून मिळणारे अनुदान या वृद्धाश्रमाला मिळते की नाही, हे पाहावे. मिळत नसेल तर सरकारला त्याबाबत सांगावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या सर्व ज्येष्ठांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा की चांगले विचार घेऊनच आम्ही समाजात काम करावे.

Web Title: Diwali in the vulnerable atmosphere of the middle class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.