डीजेच्या नादात वापस गेली वरात... वाजत आले, लाजत गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 09:51 PM2019-05-17T21:51:46+5:302019-05-17T21:52:31+5:30

लग्नाचा मुहूर्त अत्यंत काळजीपूर्वक शोधला जातो. विचारपूर्वक ठरवला जातो. पण तोच शुभमुहूर्त किरकोळ शौकासाठी बेमुर्वतपणे मोडलाही जातो. मुहूर्तावर लग्न न लागणे ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. पण आर्णी तालुक्यातील एका नवरीने हिंमत दाखवली अन् मुहूर्त टाळणाऱ्या नवरदेवाला चांगलाच हिसका दाखवला.

The DJ turned back in tears ... It was awkward, he was ashamed | डीजेच्या नादात वापस गेली वरात... वाजत आले, लाजत गेले

डीजेच्या नादात वापस गेली वरात... वाजत आले, लाजत गेले

googlenewsNext
ठळक मुद्देवाजंत्री बहु गलबला न करणे.... शुभमंगल सावधान!

हरिओम बघेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्णी : लग्नाचा मुहूर्त अत्यंत काळजीपूर्वक शोधला जातो. विचारपूर्वक ठरवला जातो. पण तोच शुभमुहूर्त किरकोळ शौकासाठी बेमुर्वतपणे मोडलाही जातो. मुहूर्तावर लग्न न लागणे ही आता सामान्य गोष्ट झाली आहे. पण आर्णी तालुक्यातील एका नवरीने हिंमत दाखवली अन् मुहूर्त टाळणाऱ्या नवरदेवाला चांगलाच हिसका दाखवला. डीजे लावून नाचण्यात मश्गूल असलेल्या वरातीला तिने ‘गो बॅक’ म्हटले. मग चिडलेल्या गावकऱ्यांनीही ही वरात थेट गावाबाहेरच पिटाळून लावली.
लग्नात बेभान नाचण्याची हौस करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही घटना आर्णी तालुक्यातील पिंपळनेर गावात शुक्रवारी घडली. स्वाती शिवदास आडे या तरुणीचा शारी गावातील युवकासोबत विवाह ठरला होता. शुक्रवारी वधूमंडपी लग्नाची जय्यत तयारी झाली होती. पण वरात गावात आली, तरी मांडवात येईना. बराच वेळ झाला, वधूपक्षाकडील पाहुणेही कंटाळून गेले. अखेर काही जणांनी शोध घेतला असता वराकडील पाहुणे नुसते डीजेच्या तालावर नाचण्यातच बेभान झाल्याचे कळले. शेवटी लग्न वेळेवर लावण्यासाठी वधूचे काका वरातीपर्यंत पोहोचले. त्यांनी नाचणाऱ्या युवकांना मंडपात येण्याची विनंती केली. मात्र बेधुंद युवकांनी काकांना विरोध करीत चक्क धक्काबुक्की केली. हे दृश्य पाहताच पिंपळनेर गावातील लोकही चिडले. वाद वाढला. ही वार्ता वधू स्वातीपर्यंत पोहोचली. वडील नसलेल्या स्वातीची सर्व जबाबदारी काकांनीच सांभाळली. त्यामुळे काकाचा अपमान ती सहन करू शकली नाही. यातच तिने अशा मुलांशी लग्नच करणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त केला. काका आणि भावानेही स्वातीच्या निर्णयाला दुजोरा दिला. मग पिंपळनेर गावकºयांनी नाचणाºया वरपक्षाची चांगलीच ‘वरात काढली’. डीजे सकट सर्वांना गावाबाहेर पिटाळून लावले. वाजत गाजत आलेली शारी येथील वरात लाजत लाजत परत गेली. वाद मिटविण्यासाठी पोलीसही पोहोचले. मात्र वरात परत गेलीच. या प्रकाराने लग्नातील नाचण्याच्या अनाठायी हौसेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला. लग्नासारख्या पवित्र प्रसंगाला काही जण गालबोट लावतात. त्यामुळे वाजंत्री बहु गलबला न करणे या मंगलाष्टकाचा अर्थ लक्षात घेऊन वºहाड्यांनी सावधान होण्याची गरज आहे.
ऐनवेळी निरंजनने राखली प्रतिष्ठा
बेभान झालेल्या वरातीवर संताप व्यक्त करीत स्वातीने शारीच्या मुलासोबत लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर दिवसभर वधू मंडपात संतापाचे आणि काळजीचे वातावरण होते. मात्र सायंकाळ होता होता स्वातीच्याच आत्याचा शेतकरी मुलगा निरंजन उत्तम राठोड हा स्वातीशी लग्न करण्यासाठी मांडवात उभा राहिला. सायंकाळी सर्व पाहुण्यांच्या आशीर्वादात स्वाती निरंजनसोबत विवाह करून महाळूंगीकडे रवाना झाली. केवळ नववीपर्यंत शिकलेल्या स्वातीने दाखविलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे.

Web Title: The DJ turned back in tears ... It was awkward, he was ashamed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न