दो धागे श्रीराम के नाम उपक्रम : साडेबारा लाख भाविकांनी बनविले महावस्त्र
By रूपेश उत्तरवार | Published: January 18, 2024 08:25 PM2024-01-18T20:25:04+5:302024-01-18T20:25:35+5:30
रूपेश उत्तरवार/ यवतमाळ : अयोध्येतील प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी होणार आहे. प्रभू रामचंद्राच्या मूर्तीला परिधान केला ...
रूपेश उत्तरवार/ यवतमाळ : अयोध्येतील प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी रोजी होणार आहे. प्रभू रामचंद्राच्या मूर्तीला परिधान केला जाणारा कपडा १२ लाख ३६ हजार २०० भाविकांनी हातमागावर बनविला आहे. रेशमापासून १३ दिवसात हे कापड तयार झाले आहे. पुण्यात हे महाकापड सात रंगांचे बनविण्यात आले. विशेष म्हणजे या कापडावरून यवतमाळातील सोनाली खेडेकर या डिझायनरने ९ कारागिरांच्या मदतीने पुण्यात पोषाख तयार केला असून हे वस्त्र श्रीरामजन्मभूमी न्यासाकडे मंगळवारी सुपूर्द करण्यात आले.
यवतमाळमधील सेवानिवृत्त कृषी अधिकारी गिरीधर नागपुरे आणि महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या ज्येष्ठ सदस्या पुष्पा नागपुरे यांची कन्या सोनाली खेडेकर ही पुण्यामध्ये राहते. तेथे तिचे स्वत:चे बुटीक आहे. साडेबारा लाख लोकांनी मिळून हातमागावर जे कापड बनविले, ते कापड पुण्यातील हँडलुमच्या संचालिका अनघा घैसास यांनी सोनाली खेडेकर यांच्याकडे पोषाख बनविण्यासाठी दिले. सोनाली यांनी त्यांच्याकडील नऊ कारागिरांच्या मदतीने प्रभू रामचंद्रांसाठी अंगरखा, उपरणे आणि धोती असा पोषाख तयार केला. विशेष म्हणजे, या पोषाखावर एंब्रॉयडरी, काशिदाकरी, मोतीकाम आणि इतर कलाकुसर साकारण्यात आली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सात पोषाख बनविण्यात आले आहेत. प्रभू रामचंद्रांसाठी पोषाख निर्मिती करण्याचा आयुष्यातील सोनेरे अनुभव असल्याच्या भावना सोनाली यांनी व्यक्त केल्या.
१० ते २२ डिसेंबरपर्यंत विशेष मोहीम
अनघा घैसास यांनी त्यांच्या हँडलुमच्या माध्यमातून १२ लाख ३६ हजार भाविकांच्या माध्यमातून प्रभू रामचंद्राच्या पोषाखासाठी कापड निर्मिती केली आहे. १० ते २२ डिसेंबर असे १२ दिवस दररोज सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत हे काम चालले. दर दिवसाला ७० ते ८० हजार भक्तांनी यासाठी योगदान दिले.
पुणे येथील अनघा घैसास सातत्याने हातमाग वैभवाला जपण्याचे काम करीत आहे. त्या नॅशनल टेक्सटाईल कमिटीच्या सदस्य असून, इंडियन इंस्टिट्यूट हँडलुम गव्हर्निंग कौन्सिलच्याही मेंबर आहेत. तर सरदार वल्लभभाई पटेल टेक्सटाईल युनिव्हर्सिटीच्या गव्हर्नर आहेत. देशभरात ११० हातमाग आहेत. हातमाग विणकरांचा गौरव व्हावा त्यांच्या कामाला सन्मान मिळावा यासाठी दरवर्षी त्या उत्सव घेतात. त्यांनी यावेळी भगवा, केशरी, लाल, हिरवा, पिवळा, जांभळा, निळा, ऋगवेदातील शास्त्रानुसार हे महावस्त्र तयार केले आहे. त्यात कुठलाही केमिकल रंग नाही.
सोनाली खेडेकर या मूळच्या यवतमाळच्या आहे. त्यांचे बी.ई.पर्यंत शिक्षण झाले आहे. काही काळ नोकरी केल्यानंतर त्यांनी ड्रेस डिझायनिंग व्यवसायात स्वत:ला झोकून दिले. त्यांना दुबईत इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. शिवसेनेचे माजी आमदार बापूसाहेब खेडेकर यांच्या त्या सुनबाई आहेत. सध्या त्या मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलावंतांच्या ड्रेसडिझायनिंगचे काम करतात.
श्रीराम जन्मभूमी न्यास कार्यालयाने महावस्त्र बनविण्याची जबाबदारी माझ्याकडे दिली होती. त्यावर आम्ही दीड वर्षांपासून काम करीत आहे. प्रभू रामचंद्राचा पोषाख सोनाली खेडेकरांनी केला. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना हा पोशाख रीतसर कार्यक्रमात १६ जानेवारीला सुपूर्द करण्यात आला. या कार्यात साडेबारा लाख भाविकांचे योगदान आहे.- अनघा घैसास, सौदामिनी हँडलुम संचालिका, पुणे