आचारसंहितेपूर्वी दारूबंदी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 11:28 PM2019-01-19T23:28:40+5:302019-01-19T23:30:00+5:30
दारूबंदी न केल्याने समाज व्यवस्था डळमळीत झाली आहे. मात्र सरकारला त्याची चिंता नाही. सत्ताधारी आणि विरोधकांकडून दारूबंदीचे लेखी आश्वासन घ्या. सरकारने आचारसंहितेपर्यंत दारूबंदी न केल्यास अशा लोकांना मतदानही करू नका, ......
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दारूबंदी न केल्याने समाज व्यवस्था डळमळीत झाली आहे. मात्र सरकारला त्याची चिंता नाही. सत्ताधारी आणि विरोधकांकडून दारूबंदीचे लेखी आश्वासन घ्या. सरकारने आचारसंहितेपर्यंत दारूबंदी न केल्यास अशा लोकांना मतदानही करू नका, असा नारा नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी स्वामिनीसह विविध संघटनांच्या मदतीने काढलेल्या मोर्चात दिला.
जिल्हा दारूबंदीच्या मागणीसाठी शुुक्रवारी हजारोे महिलांनी एकत्र येत यवतमाळात महामोर्चा काढला. मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करताना मेधा पाटकरांनी सरकारवर सडकून टीका केली. सरकारला जनतेचे काहीही देणेघेणे नाही, स्वत:ची खुर्ची आणि पैसाच हवा आहे. दारूच्या माध्यमातून १८ हजार कोटींचा महसूल मिळतो. तो निवडणुकीत पक्षाला दिला जातो. आज चहावाला पंतप्रधान झाला. उद्या दारूवाला पंतप्रधान होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्वत:ला धर्म आणि संस्कृती रक्षक म्हणविणाºयांनी मानवता धर्म जपला पाहिजे. गत दहा वर्षात साडेतीन लाख शेतकरी आत्महत्या झाल्या. तर दारूमुळे १० लाख आत्महत्या झाल्या. यानंतरही सरकार गंभीर नाही. अशा सरकारला धडा शिकविला पाहिजे. म्हणूनच मतदान करू नका, असा सल्ला पाटकर यांनी दारूबंदीची मागणी करणाºया महिलांना दिला.
पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा-गोस्वामी
चंद्रपूर दारूबंदीच्या प्रणेत्या, श्रमिक एल्गारच्या पारोमिता गोस्वामी म्हणाल्या, दारुबंदीचा विषय गांभीर्याने न घेणारे पालकमंत्री मदन येरावार यांनी राजीनामा द्यावा. ते राजीनामा द्यायला तयार नसतील तर मतदानाच्या माध्यमातून त्यांना घरी बसवा. तर विरोधकांनीही लेखी आश्वासन दिल्याखेरीज त्यांनाही मतदान करू नका. चंद्रपुरात दारूबंदी झाल्यानंतरही दारू विकली जाते, असा अपप्रचार होतो. त्याला बळी न पडता दारूबंदी करा. सर्वसामान्यांचे अच्छे दिन नाही. तर दारू, रेती, कोळसा ठेकेदाराचे अच्छे दिन आहेत. संपूर्ण विदर्भ दारूमुक्त व्हावा, असे मत त्यांनी मांडले.
दारुबंदीची लढाई तीव्र करा- योगेंद्र यादव
दिल्लीतील नेते, राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी दारूब्ांदी हा यवतमाळचाच नव्हेतर संपूर्ण देशाचाच प्रश्न असल्याचे मत व्यक्त केले. आयुष्यमान स्वस्थ भारत योजनेचा गाजावाजा होतो. याचवेळी सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळले जाते. त्यामुळे दारुबंदीची लढाई अधिक तीव्र करा, असे ते म्हणाले.
नरेंद्र मोदींना खाली खेचा- प्रतिभा शिंदे
जळगावातील जनसंघर्ष मार्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे म्हणाल्या, सरकार कंपन्यांचा फायदा करते आणि गरिबांना खाते. नरेंद्र मोदींची ५६ इंचाची छाती असेल तर संपूर्ण देशात दारूबंदी करून दाखवावी. मुख्यमंत्र्यांचा खरपूस समाचार घेत दारूबंदी न केल्यास खुर्चीचे पाय खाली खेचण्याचे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रवंदनेने दारूबंदीची शपथ
यावेळी स्वामिनीचे मुख्य संयोजक महेश पवार, मनिषा काटे, मराठा सेवासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप महाले, आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड, हरिश इथापे, पुनमताई जाजू यांची भाषणे झाली. मुस्लिम महिलांनी कुराणातील दारूला विरोध असणाºया ओळी वाचून दाखविल्या.
तर गुरूदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवंदना करून दारूबंदीची शपथ दिली. मोर्चाच्या वेळी झालेल्या सभेचे सूत्रसंचालन मनिषा काटे यांनी केले.
येरावार नव्हे येडावार- पारोमिता
पालकमंत्री मदन येरावार जिल्ह्यात दारूबंदी करण्यास तयार नसतील, तर त्यांच्या घरावर मोर्चा न्या. हे येरावार नाही तर येडावार आहेत, अशा शब्दात पारोमिता गोस्वामी यांनी पालकमंत्र्यांवर टीकेची तोफ डागली.