वर्षपूर्तीचा उत्सव नको, संपर्क वाढवा
By admin | Published: October 17, 2015 12:52 AM2015-10-17T00:52:18+5:302015-10-17T00:52:18+5:30
राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारच्या वर्षपूर्तीचा कुठेही उत्सव साजरा करू नका, त्याऐवजी जनतेत शेवटच्या माणसापर्यंत संपर्क अभियान राबवा, ...
भाजपा आमदारांना निर्देश : तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याच्या सूचना
यवतमाळ : राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारच्या वर्षपूर्तीचा कुठेही उत्सव साजरा करू नका, त्याऐवजी जनतेत शेवटच्या माणसापर्यंत संपर्क अभियान राबवा, असे निर्देश जिल्ह्यातील भाजपाच्या पाचही आमदारांना मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी दिले आहे.
युती सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने बुधवारी मुंबईत राज्यातील भाजपाच्या सर्व आमदारांची बैठक बोलविण्यात आली होती. सरकारच्या व आमदारांच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा यावेळी घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी या बैठकीत संबोधित केले. युती सरकारला एक वर्ष पूर्ण झाले म्हणून कुठेही उत्सव साजरा करू नये, अशा सूचना आमदारांना देण्यात आल्या. त्याऐवजी गेल्या वर्षभरात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जनतेच्या हितार्थ जाहीर केलेल्या योजना, राज्य शासनाच्या लोकांसाठी असलेल्या योजनांची माहिती, पक्षाची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहोचवा, त्यासाठी लोकांमध्ये जा, संपर्क अभियान राबवा, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती जिल्ह्यातील एका आमदाराने ‘लोकमत’ला दिली. मात्र भाजपाच्या विस्तारासाठी दिलेला कार्यक्रम, शिवसेनेकडून मिळणारी वागणूक व अन्य काही मुद्यांवर झालेल्या चर्चेची माहिती देणे या आमदारांनी टाळले. (जिल्हा प्रतिनिधी)