छोरा काढवे गेरणी धुंड करिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 10:08 PM2018-03-03T22:08:32+5:302018-03-03T22:08:32+5:30
तालुक्यातील बंजारा समाजाने आपली परंपरा जपत यावर्षी होळी आणि रंगपंचमीचा सण आधुनिकतेची जोड देवून साजरा केला. ‘छोरा काढवे गेरणी धुंड करिया’ असे गात समाजबांधव रंगपंचमीच्या रंगात न्हाऊन गेले.
प्रकाश सातघरे ।
ऑनलाईन लोकमत
दिग्रस : तालुक्यातील बंजारा समाजाने आपली परंपरा जपत यावर्षी होळी आणि रंगपंचमीचा सण आधुनिकतेची जोड देवून साजरा केला. ‘छोरा काढवे गेरणी धुंड करिया’ असे गात समाजबांधव रंगपंचमीच्या रंगात न्हाऊन गेले.
दिग्रस तालुक्यात सर्वाधिक बंजारा बांधवांचे वास्तव्य आहे. तालुक्यात बंजारा तांड्यांमध्ये रानमाळावर मोठ्या प्रमाणात बंजारा समाजबांधव राहतात. या तांड्यांवर होळी आणि रंगपंचमीला डफडीचा आवाज घुमतो. विविध गीते गात पारंपरिक पद्धतीने होळी आणि रंगपंचमी साजरी केली जाते. मात्र आता या सणांना आधुनिकतेची जोड दिली जात आहे. विविध गीतांच्या तालावर थिरकत नायकाच्या हातातील डफडीच्या तालावर बंजारा बांधव पारंपरिक पेहरावात नृत्य करतात. लेंगी गीते ही बंजारा लोकसाहित्याची खास मेजवाणी असते. या गीतातून निसर्गाचे वर्णन केले जाते. तसेच ईश्वराप्रती भावना व्यक्त केल्या जातात.
या लेंगी गीतांमध्ये बरेचदा खोडकरपणाही डोकावतो. फाग आणि लेंगी म्हणजे वर्षभर न विसरणारा क्षण असतो. ‘फागन को महिना गिरीधारी, असे फागनेम गेरणी फळछ’ असे लेंगी गीतांचे स्वरूप असते. ‘मत मार रे मोहन रंग पिचकारी, जमने हातेम चंदन केरो लोटा’ असे म्हणत समाजबांधव पिचकारीतून रंगांचा वर्षाव करतात. गोरबंजारा समाजाचे लोक वाङ्मय लेंगीच्या रूपात दिसून येते. ‘छोरा काढये गेरणी धुंड करिया, टाळ टाळ गेरिया तोपर छोडीया’ असे म्हणत खोडकर लेंगी सादर केली जाते.
होळी आई रे होळी डगर चाली
बंजारा समाजाची होळी आणि रंगपंचमी लेंगी गीतांच्या श्रृंगाराने नटून जाते. ‘होळी आई रे होळी डगर चाली, उतो गेरियान बेटा आशीद दे चाली’ यातून सर्वांच्या वंशाला दिवा मिळो, अशी मागणी केली जाते. गोरगरिबांना पूत्र रत्न देवून आशीर्वादात देण्याची मागणी केली जाते. ही लेंगी गीते आशय समृद्ध असतात. तालुक्यातील वसंतनगर, वरंदळी, आरंभी, साखरा, सेवानगर, झिरपूरवाडी, मोख येथील समाजातील महिला व पुरुष आधुनिक युगातही पारंपरिक गीते जोपासून आहेत. प्रत्येक ज्येष्ठाच्या तोंडी ही गीते चफकलपणे दिसून येतात.