५६ आरोपींना जामीन देऊ नका; एसआयटीचा अहवाल

By सुरेंद्र राऊत | Published: October 10, 2024 04:51 PM2024-10-10T16:51:13+5:302024-10-10T16:53:40+5:30

महिला बॅंक अपहार : ८० आरोपींची तात्पुरत्या जामिनासाठी धाव

Do not grant bail to the 56 accused; Report of SIT | ५६ आरोपींना जामीन देऊ नका; एसआयटीचा अहवाल

Do not grant bail to the 56 accused; Report of SIT

यवतमाळ : बाबाजी दाते महिला सहकारी बॅंकेत २४२ कोटींच्या अपहार प्रकरणात २०६ जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहे. जवळपास दोन महिने लोटूनही यात केवळ सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेसह विशेष तपास पथक यावर काम करीत आहे. तात्पुरता जामीन (अंतरिम) मिळावा यासाठी ८० आरोपींनी यवतमाळ जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केले आहे. यावर न्यायालयाने तपास पथकाला से मागितला आहे. आतापर्यंत ५६ आरोपींच्या बाबत एसआयटीने से दिला आहे. 

संगनमताने बाबाजी दाते महिला सहकारी बॅंकेत पैसा गुंतविणाऱ्या ठेवीदारांची फसवणूक करण्यात आली. अनेक बोगस प्रकरणे करून २४२ कोटींची रक्कम हडपली. या अफरातफरीत बॅंकेतील अधिकारी, संचालक, पदाधिकारी आणि काही कर्जदारांचाही समावेश आहे. मूल्यांकनकार व आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचा ठपका आहे. यामुळे या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून विशेष तपास पथकाकडे देण्यात आला. या पथकात मर्यादित मनुष्यबळ व त्यातही त्यांच्यावर विविध प्रकारच्या बंदोबस्ताची जबाबदारी सोपविण्यात येते. यामुळे हा महत्वपूर्ण तपास अतिशय संथगतीने सुरू आहे. या अपहारात अनेक सेवानिवृत्तांची जीवनभराची कमाई बुडाली आहे. काही पतसंस्थांनीसुद्धा बाबाजी दाते महिला सहकारी बॅंकेत गुंतवणूक केली होती. त्या पतसंस्था आज अडचणीत आल्या आहेत. तेथील ठेवीदारही केलेल्या गुंतवणुकीबाबत चिंताग्रस्त आहे. 

दिवसाढवळ्या संगनमत करून अडीच अब्ज रुपयावर डल्ला मारण्यात आला. आता पोलिस तपास पूर्ण होऊन या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा होईल, आरोपींची संपत्ती जप्त करून त्याचा लिलाव करीत बुडालेली ठेव परत मिळेल, अशी आशा येथील ठेवीदारांना लागली आहे. 

या गंभीर प्रकरणात अजूनही तपासाला अपेक्षित गती मिळालेली नाही. सात आरोपींना अटक करण्यात आली. ज्यामध्ये सुजाता महाजन, विलास महाजन या दाम्पत्यासह इतर पाच जणांचा सहभाग आहे. हा तपास गतिमान करून प्रकरण लवकरात लवकर न्याय प्रविष्ठ करावे, अशी मागणी ठेवीदारांनी केली आहे. 

विशेष पथकाला तपासाचा भार का ?
एखाद्या मोठ्या अपहाराच्या, गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष पथक तयार केले जाते. या पथकाकडे इतर दुसरे कोणतेच काम देणे अपेक्षित नाही. असे असतानाही या विशेष पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना बंदोबस्तात का गुंतविले जाते असा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा परिणाम गुन्ह्याच्या तपासावर होताना दिसत आहे. आरोपी राजरोसपणे गावात फिरत आहेत.

Web Title: Do not grant bail to the 56 accused; Report of SIT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.