स्त्रियांकडे मादी म्हणून नव्हे माय म्हणून बघा
By admin | Published: March 18, 2016 02:43 AM2016-03-18T02:43:41+5:302016-03-18T02:43:41+5:30
जगाचे दु:ख पचविण्याची ताकद महिलांमध्ये आहे. स्त्रियांकडे मादी म्हणून नव्हे तर माय म्हणून बघा, असे आवाहन अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांनी केले.
सिंधूताई सपकाळ : बोरीअरब येथे विठ्ठल नामजप रौप्य महोत्सव
दारव्हा/बोरीअरब : जगाचे दु:ख पचविण्याची ताकद महिलांमध्ये आहे. स्त्रियांकडे मादी म्हणून नव्हे तर माय म्हणून बघा, असे आवाहन अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांनी केले.
दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथे सुरू असलेल्या विठ्ठल नामजप रौप्य महोत्सवात गुरुवारी त्या मार्गदर्शन करीत होत्या. मोठ्या संख्येने उपस्थित महिलांचे त्यांनी कौतुक केले. विदर्भातील संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा अवर्जून उल्लेख केला. त्यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. अर्धवट कपडे घालणाऱ्या महिलांवर सडकून टिका केली. विज्ञान युगात वावरत असलो तरीही महिलांनी कुटुंब सांभाळणे तितकेच महत्त्वाचे आहे. आई-वडिलांची मान लाजेने खाली जाईल, अशी वर्तणूक करू नये, असे आवाहन त्यांनी तरुण-तरुणींना केले.
मी नऊवारी साडी परिधान करून अमेरिकेला गेले होते. तिथे काहीवेळ संकोच वाटला. पण तेवढ्यात आवाज आला, नऊवारी श्रेष्ठ-जय महाराष्ट्र! हे वाक्य कानावर पडताच अभिमान वाटला, अशा शब्दात त्यांनी आपल्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. ७५० पुरस्कारांचे मानकरी व हजारो अनाथांची माता असले तरी भिकारी म्हणून आयुष्य जगले. अनेक वर्ष रेल्वे स्टेशनवर भिक मागण्यात गेले. लाडखेड स्टेशनवरही भिक्षा मागितल्याच्या आठवणीला माईने उजाळा दिला.
त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही फुंकर घातली. तरुणांनी मोबाईलचा अतिवापर टाळला पाहिजे. वडील मुलांच्या शिक्षणासाठी काळजी करतात. मुलगा मोठा झाल्यावर जन्मदात्यांना विसरत असल्याची खंत सिंधूतार्इंनी व्यक्त केली. विदर्भाची लेख म्हणून मला चोळीबांगडीचा अहेर द्या, तो माझा हक्क आहे. माझी झोळी भरून पाठवा, असे आवाहन करताच उपस्थित महिला-पुरुषांनी सन्मई बाल निकेतनला भरभरून आर्थिक मदत केली. माई व्यासपिठावरून उतरून गाडीत बसताच महिलांनी अश्रूला वाट मोकळी केली. (वार्ताहर)