नगरपरिषद हद्दीत दारू दुकाने नकोच!
By admin | Published: April 28, 2017 02:35 AM2017-04-28T02:35:14+5:302017-04-28T02:35:14+5:30
सर्वोच्च न्यायालयाने राज्य महामार्गावरील ५०० मीटरआतील दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिग्रसच्या नगरसेवकांचे निवेदन : मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री, महसूल राज्यमंत्र्यांना साकडे
दिग्रस : सर्वोच्च न्यायालयाने राज्य महामार्गावरील ५०० मीटरआतील दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र काही दारू विक्रेत्यांनी त्यावर शक्कल लढविणे सुरू केले आहे. मात्र या प्रकाराला नगरपरिषदेतील बहुतांश नगरसेवकांनी विरोध करून नगरपरिषदेच्या हद्दीत दारू दुकाने नकोच, अशी भूमिका घेतली. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदनही पाठविण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर १ एप्रिलपासून दारू दुकाने व बारला टाळे लागले आहे. प्रत्येक महामार्ग व शहराजवळील दारू दुकाने बंद झाली आहे. परंतु यावर मात करण्यासाठी काही दारू विक्रेत्यांनी शहरातील रस्त्यांची मालकी बदलविण्याचा प्रयत्न केला आहे. यवतमाळ शहरात तर अशा पद्धतीने दारू विक्रेत्यांना अभयही देण्यात आले. मात्र दिग्रस शहरातील बंद झालेली दारू दुकाने पुन्हा सुरू करू नये, यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, पालकमंत्री मदन येरावार, जिल्हाधिकारी आणि नगरपरिषद प्रशासनाला निवेदन दिले आहे.
निवेदनावर नगरपरिषद उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे, सभापती जावेद पहेलवान, सै.अक्रम, बाळू जाधव, के.टी. जाधव, नगरसेवक केतन रत्नपारखी, किशोर साबू, डॉ.संदीप दुधे, फिरोज पटेल, मंदा गाडे, सुनंदा पांढरकर, खुर्शिद बानो, वसंत मडावी, नवरंगाबादे आदींच्या स्वाक्षऱ्या आहे. (शहर प्रतिनिधी)