‘डीएचओ’, जिल्ह्यात काम करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 11:24 PM2018-12-29T23:24:25+5:302018-12-29T23:26:34+5:30

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हस्तांतरणाबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी दुर्योधन चव्हाण हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार-खासदारांना चुकीची माहिती देत असल्याचे निष्पन्न झाले.

Do not work in the 'DHO' district | ‘डीएचओ’, जिल्ह्यात काम करू नका

‘डीएचओ’, जिल्ह्यात काम करू नका

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर गरजले : ‘डीपीसी’मध्ये खासदार-आमदारांना चुकीची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हस्तांतरणाबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी दुर्योधन चव्हाण हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार-खासदारांना चुकीची माहिती देत असल्याचे निष्पन्न झाले. त्यावर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी ‘डीएचओ’, तुम्ही या जिल्ह्यात काम करू नका, अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला.
जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी पालकमंत्री मदन येरावार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ना. हंसराज अहीर, खासदार भावना गवळी, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे, यवतमाळच्या नगराध्यक्ष कांचन चौधरी, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा कारभार प्रकर्षाने गाजला. मालखेडचे प्राथमिक आरोग्य केंद्र अद्याप का सुरू झाले नाही, अशी विचारणा केली असता डीएचआेंनी ती इमारत अद्याप हस्तांतरित झाली नसल्याचे सभागृहात सांगितले.तर बांधकाम अभियंत्याने ही इमारत केव्हाच हस्तांतरित झाल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे डीएचओंच्या कारभाराची पोलखोल झाली. त्यानंतर त्यांनी मनुष्यबळ नसल्याने पीएचसी चालू केली नाही, असा बचाव घेतला.
‘जीबी’ची प्रतीक्षा कशाला ?
४ जानेवारीला जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आहे. त्यात पीएचसीसह अनेक विषय चर्चेला येतात, असे डॉ.चव्हाण यांनी सांगितले. त्यावर पीएचसीच्या उद्घाटनासाठी झेडपीच्या जीबीची प्रतीक्षा कशाला असा सवाल अहीर यांनी उपस्थित केला. डीएचओंची एकूणच सभागृहाला दिशाभूल करण्याची भूमिका पाहून ना. अहीर जाम संतापले. मंत्री, खासदार, आमदार व प्रशासनाला चक्क खोटी माहिती दिली म्हणून ना. अहीर यांनी डीएचओ चव्हाण यांची चांगलीच खरडपट्टी काढली. त्यांच्यावर कारवाईच्या सूचना दिल्या. एवढेच नव्हे तर तुम्ही या जिल्ह्यात काम करू नका अर्थात बदली करून निघून जा, अशी समजही दिली. खासदार भावना गवळी यांनीही आरोग्य प्रशासन झोपले आहे का अशा शब्दात आपला रोष व्यक्त केला. जिल्ह्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा पूर्णत: ढेपाळल्याचे व त्याचा परिणाम सामान्य नागरिकांच्या आरोग्य सेवेवर होत असल्याचे गवळी यांनी सांगितले. गेल्या वर्षभरात कोणकोणत्या पीएचसीच्या इमारती बांधून झाल्या, त्याचा आराखडा सादर करण्याचे निर्देश डीएचओंना दिले. डीएचओ आणि त्यांच्या अधिनस्त यंत्रणेच्या कारभारावर जिल्हा परिषदेच्या सदस्या स्वाती येंडे यांनीही बैठकीत आक्रमक भूमिका मांडली. डीएचओंचे यंत्रणेवर तर सीईओंचे डीएचओंवर नियंत्रण नसल्याचा आरोप त्यांनी केला. डीएचओ यवतमाळबाबत चांगले बोलत नाहीत, कायम बदलून जाण्याची भाषा करतात, असेही येंडे यांनी सांगितले.
डीएचओंबाबत जिल्हा प्रशासनाचे मत चांगले आहे मात्र त्यांचा आत्मविश्वास कमी पडत असल्याचे दिसून आले. डीएचओंवर व्यक्त करण्यात आलेला रोष पाहता जिल्हा परिषदेचे ‘कन्सेन्ट’ न घेता पीएचसीचे तातडीने उद्घाटन उरकण्याचा बैठकीतील भाजपा नेत्यांचा मनसुबा तर नव्हे, अशी चर्चा बैठकीनंतर ऐकायला मिळाली.
पालकमंत्र्यांचा ‘डीएचओं’ना सल्ला
ना. अहीर सभागृहातून निघून गेले. तेव्हा अपडेट माहिती नसेल तर शांत रहावे, खोटी माहिती देऊ नये, असा सल्ला पालकमंत्र्यांनी डीएचओंना दिला.
खासदार म्हणतात, नरेगा कागदावरच
भावना गवळी यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत दोन वर्षांपासून जिल्ह्यात कामे बंद असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर पालकमंत्र्यांनी यवतमाळ जिल्हा नरेगाच्या कामात टॉपवर असल्याचे सांगितले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी नरेगाची कामे कुठे व किती सुरू आहेत याची सांख्यिकीय माहिती वाचून दाखविली.परंतु त्यामुळे खासदार गवळी यांचे समाधान झाले नाही. नरेगाची ही कामे केवळ कागदावरच दिसतात, फिल्डवर प्रत्यक्षात ती पहायला मिळत नाही, अशी नाराजी व्यक्त केली.

Web Title: Do not work in the 'DHO' district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.