महसूलचे कामकाज तलाठी भवनातून करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 09:31 PM2019-05-07T21:31:54+5:302019-05-07T21:32:54+5:30
राज्यात केवळ यवतमाळ जिल्ह्यात अस्तित्वात आलेल्या तलाठी भवनांचा वापर होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. याची दखल घेत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी महसूल विभागाचे ग्रामीण भागातील कामकाज तलाठी भवनातून झाले पाहिजे यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्यात केवळ यवतमाळ जिल्ह्यात अस्तित्वात आलेल्या तलाठी भवनांचा वापर होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. याची दखल घेत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी महसूल विभागाचे ग्रामीण भागातील कामकाज तलाठी भवनातून झाले पाहिजे यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
तलाठी भवन शोभेच्या वास्तू ठरल्याची तक्रार अनेक ठिकाणी नागरिक करीत आहेत. शासनाने नागरिकांच्या सोईसाठी दिलेल्या वास्तू वापरात आल्याच पाहिजे, त्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने आढावा घेऊन जिल्ह्यातील किती तलाठी या भवनांमधून कामकाज करतात, याचा अहवाल मागविला आहे.
महसूल विभागाशी शेतकरी, विद्यार्थी, सामान्य जनता यांचा दररोजचा संबंध येतो. एकाच तलाठ्याकडे अनेक गावांचा प्रभार असल्याने त्यांचे बसण्याचे निश्चित ठिकाण नव्हते. त्यामुळे तलाठ्यांच्या सर्व महसूली कामांचे विकेद्र्रीकरण करून ते नागरिकांना ठराविक वेळेत एका जागेवर भेटावे, त्यातून जनतेच्या अडचणी, त्यांचे दाखले, प्रमाणपत्रं आदी कामांचा निपटारा व्हावा, हा तलाठी भवनाचा उद्देश आहे. शिवाय अनेक गावात तलाठी किरायाने खोली करून तेथून कामकाज करायचे. मात्र त्याचे भाडे वषार्नुवर्षे थकीत राहत असल्याचे प्रकारही निदर्शनास आले. यावर उपाय म्हणून गावात तलाठी भवन बांधण्याचा निर्णय ना. संजय राठोड यांनी घेतला. कोणत्या गावांमध्ये तलाठ्यांना कामकाजासाठी खासगी जागा, खोली भाडेपट्टीने घेतली, कोणाचे भाडे थकीत आहे, याचा अहवालही ना. राठोड यांनी जिल्हाधिकाºयांना मागितला आहे.
बांधकाम पूर्ण करून हस्तांतरणाचे आदेश
अपूर्ण तलाठी भवनाचे काम बांधकाम विभागाने तातडीने पूर्ण करून महसूल विभागाकडे हस्तांतरित करावे, अशा सूचनाही ना.राठोड यांनी केल्या. तलाठी भवनाच्या देखरेखीचे काम गावातील कोतवालांकडे सोपविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.