दारूचा त्रास आम्हाला कळतो मुख्यमंत्र्यांना कळत नाही का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 10:09 PM2019-01-10T22:09:48+5:302019-01-10T22:10:31+5:30
जिल्ह्यात दारूचा महापूर वाहत आहे. यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात आले असून व्यसनाधिन पित्यामुळे कुटुंबाची कशी वाताहत होते, याच्या यातना आम्ही भोगतोय. दारूचा त्रास आम्हाला कळतो. मुख्यमंत्र्यांना कळत नाही का? असा सवाल चिमुकल्यांनी विश्रामगृहावर झालेल्या पत्रपरिषदेत केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात दारूचा महापूर वाहत आहे. यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात आले असून व्यसनाधिन पित्यामुळे कुटुंबाची कशी वाताहत होते, याच्या यातना आम्ही भोगतोय. दारूचा त्रास आम्हाला कळतो. मुख्यमंत्र्यांना कळत नाही का? असा सवाल चिमुकल्यांनी विश्रामगृहावर झालेल्या पत्रपरिषदेत केला.
जिल्ह्यात स्वामिनी दारुबंदी संघटनेच्यावतीने १८ जानेवारी रोजी महामोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दारूपीडित चिमुकल्यांनी यावेळी केले.
प्रत्येक बालकाने दारूड्या पित्यामुळे वाट्याला आलेले दु:ख आपल्या शब्दात व्यक्त केले. इतकेच नव्हे तर दारूचे घातक परिणामही सांगितले. बालमनावर व्यसनाधिनतेमुळे कोणते परिणाम होतात, हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होते.
पत्रकार परिषदेत पूनम बोंद्रे हिने आपली वेदना मांडली. तिचे वडील दारूच्या नशेत मरण पावले. आता कुटुंब उघड्यावर आले आहे. इतर मुलांचे वडील दिसताच पूनमला आपल्या वडिलांची आठवण येते, असे तिने साश्रूनयनाने सांगितले. वेदांत गावंडे या मुलाची कहानी वेगळीच आहे. पेंटर काम करणारे त्याचे वडील वेदांतलाच दारूगुत्त्यावर पाठवित होते. दारूच्या नशेत वेदांतच्या वडिलांनी आजोबाला बेदम मारहाण केली. दोन वर्षापूर्वी आजोबा घर सोडून निघून गेले. आता वडिलांचाही मृत्यू झाला. चिमुकला वेदांत पोट भरण्यासाठी आईला मदत करतो.
या केवळ प्रातिनिधिक कहाण्या असून आपल्या जिल्ह्यातील शेकडो मुलांचे बालपण दारूने उध्दवस्त केले आहे. वडिलांच्या व्यसनामुळे या चिमुकलांच्या शैक्षणिक हक्कच नव्हे तर आनंदी जीवन जगण्याचा मूलभूत हक्कच हिरावल्या गेल्याचे यश चव्हाण या चिमुकल्याने पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी पलाश सचिन चंदनकर, अक्षरा राजेश मुरकुटे हे चिमुकले उपस्थित होते. तसेच दारूबंदी चळवळीचे संयोजक महेश पवार, प्रा. प्रवीण देशमुख, अभिलाष नीत, पवन धोत्रे, मयुरी कदम, किशोर चव्हाण उपस्थित होते.