शेतकरी कन्या किरण व पूजा होणार डॉक्टर
By admin | Published: July 23, 2016 12:03 AM2016-07-23T00:03:10+5:302016-07-23T00:03:10+5:30
बारावीच्या परीक्षेत दोन सख्या बहिणी गुणवत्ता यादीत झळकल्या. वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेतही अव्वल ठरल्या. त्यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नंबरही लागला.
चेतना अभियानातून मदत : आर्थिक अडचणीने रखडलेला वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा
रूपेश उत्तरवार यवतमाळ
बारावीच्या परीक्षेत दोन सख्या बहिणी गुणवत्ता यादीत झळकल्या. वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेतही अव्वल ठरल्या. त्यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नंबरही लागला. परंतु आर्थिक अडचणींमुळे या शेतकरी कन्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगण्याची शक्यता निर्माण झाली. अशा वेळी बळीराजा चेतना अभियान या शेतकरी कन्यांच्या मदतीला धावून आले. अभियानाच्या माध्यमातून गोळा झालेल्या लोकवर्गणीतून त्यांना प्रवेशासाठी निधी दिला जाणार आहे. यामुळे शेतकरी कन्यांचा डॉक्टर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
किरण सुभाष गायकवाड आणि पूजा सुभाष गायकवाड या नेर नबाबपूर येथील भगिनी. बारावीच्या परीक्षेत किरण गतवर्षी ८७ टक्के गुण घेऊन बारावी उत्तीर्ण झाली तर पूजा ९०.१५ टक्के गुण घेऊन यंदा विज्ञान शाखेत उत्तीर्ण झाली. या दोघींनी यंदा वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा दिली. किरणला सीईटी परीक्षेत १६४ तर पूजाला १७७ गुण मिळाले. किरणचा गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि पूजाचा नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नंबर लागला. परंतु अल्पभूधारक शेतकरी असलेल्या या दोनही कन्यांचा मेडिकल प्रवेश आर्थिक अडचणीमुळे रखडला होता.
सुभाष गायकवाड यांना २००७ मध्ये दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतून एक हेक्टर ६१ आर जमीन मिळाली होती. त्याच भरोश्यावर कुटुंबाचा गुजरान करीत होते. त्यांच्या दोनही गुणी लेकींनी बारावीत आणि वैद्यकीय पूर्व परीक्षेत नाव चमकविले. परंतु या गुणी मुलींच्या प्रवेशासाठी पैसे आणायचे कोठून असा प्रश्न निर्माण झाला. कुणी तरी त्यांंना बळीराजा चेतना अभियानाची माहिती दिली. त्यामुळे त्यांनी थेट यवतमाळ गाठून निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांची भेट घेतली. त्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्यापुढे आपली आपबिती कथन केली. जिल्हाधिकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता या दोन भगिनींच्या प्रथम वर्षाच्या शुल्कासाठी बळीराजा चेतना अभियानातून गोळा झालेल्या लोकवर्गणीतून निधी देण्याचे मान्य केले. यामुळे या दोन भगिनींचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे.