डॉक्टरांनी रुग्णसेवेसाठी पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 09:46 PM2019-06-16T21:46:17+5:302019-06-16T21:46:45+5:30
डॉक्टर उपचार करून रुग्णांना बरे करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतात. मात्र उपचाराबरोबर रुग्णांची विविध प्रकारे सेवा करता येऊ शकते, त्यासाठी शहरातील डॉक्टरांनी असोसिएशनच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा असे, आवाहन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
दारव्हा : डॉक्टर उपचार करून रुग्णांना बरे करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतात. मात्र उपचाराबरोबर रुग्णांची विविध प्रकारे सेवा करता येऊ शकते, त्यासाठी शहरातील डॉक्टरांनी असोसिएशनच्या माध्यमातून पुढाकार घ्यावा असे, आवाहन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले.
येथे डॉक्टर असोसिएशनतर्फे वैद्यकीय उपकरण पेढी उघडण्यात आली. या पेढीच्या उदाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्ष बबनराव इरवे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.नीलेश पांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संजय राठोड म्हणाले, अनेक रूग्णांना उपचारादरम्यान विविध उपकरणांची गरज भासते. ही उपकरणे अत्यंत महागडी असल्याने रुग्णांना आर्थिक भार सोसावा लागतो. यात बचत व्हावी, याकरिता डॉक्टर असोसिएशनने लोकसहभागातून वैद्यकीय उपकरण पेढी सुरू केली. हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मदन पोटफोडे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची माहिती दिली. उपकरणांची गरज भासल्यास रुग्णांनी डॉ.गोपाल अग्रवाल, डॉ.विनोद कदम यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. धन्वंतरी पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी उपकरण पेढीला सहकार्य करणाऱ्या दात्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन डॉ.अश्विनी भेंडे, तर आभार डॉ.नितीन भेंडे यांनी मानले.
कार्यक्रमाला डॉक्टर व शहरातील नागरिक उपस्थित होते. यशस्वीतेसाठी असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ.मनोज राठोड, डॉ.अमर चावके, डॉ.आशिष पोटफोडे, डॉ.सुनील देवघरे, डॉ.सुनील कराळे, डॉ.भास्कर कुटे, डॉ.नीलेश गायकवाड, डॉ.किरण चव्हाण, डॉ.वसीउल्लाह, डॉ.रिजवान शेख तसेच केमिस्ट असोसिएशनने परिश्रम घेतले.